Maharashtra Unseasonal Rain : राज्यातील ‘या’ भागांना हवामान खात्याचा अलर्ट, पुढील 3 दिवस…
कोकणातील मुंबईसह सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. राज्यात बहुतांशी भागात तापमानाचा पारा अजूनही ४० अंशावरच आहे. किनारपट्टीवरील तापमानात मात्र काही दिवसांपासून घट झाली असून ही घट कायम आहे.
एकीकडे राज्यात उन्हाचा कडाका कायम आहे. तर, दुसरीकडे पावसाला पोषक वातावरणही निर्माण झाले आहे. यामुळे राज्यातील विविध भागात काही दिवसात पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याला पुढील तीन दिवस पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. तर चंद्रपूर, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांना हवामान खात्याकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर मुंबईतही पावसाळी वातावरण निर्माण होऊन पुढील एक दोन दिवस पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, विदर्भातील काही भागांत अद्यापही उष्णतेची लाट कायम आहे. राज्यभरातील अनेक भागांत आता पावसाचीही हजेरी लागणार असून त्यामुळे उकाड्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरामध्ये सक्रिय असणारा कमी दाबाचा पट्टा निवळला असला तरी राजस्थानच्या पश्चिमेपासून विदर्भाच्या उत्तरेपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.
