Attari Border : 2 आणि 5 वर्षांची मुलं पाकिस्तानात, आई भारतात; अटारी सीमेवर ताटातुट
पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द केलेले आहेत. त्यामुळे अनेकांची आपल्या परिवरपासून ताटातुट झाली आहे.
पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द केलेले आहेत. तसंच या नागरिकांना आपल्या मायदेशी जाण्याच्या सूचना केलेल्या आहेत. त्यामुळे पाकिस्तानी नागरिक पुन्हा आपल्या मायदेशी जात आहेत. तर पाकिस्तानात देखील भारतीय नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आलेले आहेत. त्यामुळे तिथल्या भारतीयांना देखील मायदेशी परतावे लागले आहे. मात्र यात अनेकांना आपल्या परिवाराला सोडून पुन्हा आपापल्या मायदेशी जाण्याची वेळ आली आहे.
आज अटारी सीमेवर असाच एक प्रकार पुन्हा बघायला मिळाला आहे. एका 2 लेकरांची आपल्या आईपासून ताटातुट झाली आहे. 2 आणि 5 वर्षांची ही दोन चिमुकली पाकिस्तानात गेली आहेत. टर त्यांच्या आईला मात्र भारतातच राहावं लागणार आहे. ही दोन्ही मुलं पाकिस्तानी असल्याने फक्त या मुलांनाच पाकिस्तानात पाठवलं गेलं आहे. मेरठमधील सना नावाच्या या महिलेचा 2020 मध्ये कराचीमध्ये विवाह झाला. सना सध्या शॉर्टट्रम व्हिसावर माहेरी आलेली होती. मात्र आता दोन्ही देशांनी दिलेल्या सुचनेप्रमाणे केवळ दोन्ही चिमुकल्यांनाच पाकिस्तानात पाठवण्यात आलेलं आहे. त्यामुळे या दोन्ही लहान मुलांची आपल्या आईपासून ताटातुट झाली आहे.
