लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज

| Updated on: Dec 14, 2025 | 10:31 AM

अर्जेंटिनाचा फुटबॉल स्टार लिओनल मेस्सीच्या कोलकात्यातील कार्यक्रमादरम्यान चाहत्यांचा प्रचंड संताप पाहायला मिळाला. गैरव्यवस्थापनामुळे संतप्त चाहत्यांनी स्टेडियममध्ये तोडफोड करत खुर्च्या फेकल्या. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. अनेक चाहत्यांनी मेस्सीचे दर्शन न झाल्याने नाराजी व्यक्त केली, तसेच कार्यक्रमाला "घोटाळा" म्हटले.

फुटबॉल स्टार लिओनल मेस्सीच्या कोलकात्यातील कार्यक्रमादरम्यान चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह होता, मात्र कार्यक्रमाच्या गैरव्यवस्थापनामुळे या उत्साहाचे रूपांतर संतापात झाले. सॉल्ट लेक स्टेडियममध्ये मेस्सीला पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. चाहत्यांनी ५ ते १२ हजार रुपये किमतीची महागडी तिकिटे खरेदी केली होती.

परंतु मेस्सी ठरलेल्या वेळेपेक्षा खूप कमी काळ मैदानात थांबला. कडक सुरक्षा आणि व्हीआयपींच्या गर्दीमुळे चाहत्यांना मेस्सी स्पष्टपणे दिसला नाही. आयोजकांनी कार्यक्रमाचे वेळापत्रक पूर्ण केले नाही आणि मेस्सीला लवकर परतण्यास भाग पाडल्याचा आरोप चाहत्यांनी केला. यामुळे संतप्त चाहत्यांनी पाण्याच्या बाटल्या फेकल्या, खुर्च्यांची तोडफोड केली, बॅनर फाडले आणि स्टेडियमचे गेट तोडण्याचा प्रयत्न केला. काही चाहते तर थेट मैदानात उतरले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. या घटनेनंतर कार्यक्रमाच्या आयोजकांना ताब्यात घेण्यात आले असून, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही या प्रकरणावरून माफी मागितली आहे.

Published on: Dec 14, 2025 10:31 AM