दिल बहलाने के लिये ख्याल अच्छा है…! फडणवीसांनी उडवली राज ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्याची खिल्ली
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतदानाची चोरी झाल्याचा आरोप केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आरोपांना फेटाळले आहे. फडणवीस यांनी विरोधकांना आत्मपरीक्षण करण्याचे आवाहन केले आणि जनतेचा आदर करण्याची गरज अधोरेखित केली.
मनसे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात, पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीत मत चोरी झाल्याचा गंभीर आरोप केला. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता त्यांनी या दाव्याची टिंगल उडवली. फडणवीस म्हणाले, मला गालिबचा एक शेर आठवतो, ‘दिल बहलाने के लिये ख्याल अच्छा है…’ मी यावर फक्त एवढेच म्हणेन. जोपर्यंत विरोधक सत्य स्वीकारणार नाहीत, तोपर्यंत त्यांची हीच अवस्था राहील.
पुढे बोलताना फडणवीस यांनी सांगितले, 2014 मध्ये नरेंद्र मोदी जिंकले तेव्हा देशात आणि राज्यात काँग्रेसची सत्ता होती, तब्बल 15 वर्षे त्यांचे वर्चस्व होते. जोपर्यंत विरोधक आत्मपरीक्षण करणार नाहीत की, आपण का हरलो, जनतेने आपल्याला का नाकारले, याचा विचार न करता केवळ छाती बडवण्याचे काम करतील, तोपर्यंत त्यांना विजय मिळणार नाही. जोपर्यंत विरोधक जनतेचा अपमान करत राहतील, तोपर्यंत त्यांना निवडणुकीत यश मिळणार नाही.
