IMD Weather Forecast : राज्यावर तिहेरी संकट, महाराष्ट्रासह ‘या’ 14 राज्यांना अतिवृष्टीचा इशारा; समुद्रात नेव्ही, कोस्ट गार्ड सतर्क
महाराष्ट्रासह 14 राज्यांवर सध्या तिहेरी नैसर्गिक संकट घोंगावत आहे. भारतीय हवामान विभागाने तीन कमी दाबाचे पट्टे तयार झाल्याने मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा हाय अलर्ट जारी केला आहे. मुंबईच्या समुद्रात नेव्ही आणि कोस्टगार्डला सतर्कतेवर ठेवण्यात आले असून, नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महाराष्ट्रासह देशातील 14 राज्यांवर सध्या तिहेरी संकटाची परिस्थिती निर्माण झाली आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, एकाच वेळी तीन कमी दाबाचे पट्टे निर्माण झाल्याने मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे महाराष्ट्रात आधीच पावसामुळे झालेल्या मोठ्या नुकसानीत आणखी वाढ होण्याची भीती व्यक्त होत आहे.
नद्या, पूर आणि नाल्यांमुळे शेती, घरे आणि रस्त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मुंबईच्या समुद्रात नेव्ही आणि कोस्टगार्डला अलर्ट मोडवर ठेवण्यात आले आहे. कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी ते सज्ज आहेत. तसेच, पर्यटनाच्या बोटी आणि मुंबई ते अलिबाग जाणाऱ्या बोटी सुरू असल्या तरी, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नाशिकसह राज्यातील अनेक जिल्ह्यांना आज यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी, असे हवामान विभागाने म्हटले आहे.
