Mumbai BMC Election : मुंबई अन् ठाणे महापालिकेत चौरंगी लढत, 29 पैकी 18 ठिकाणी महायुती आमने-सामने
मुंबई आणि ठाणे महापालिकेत चौरंगी लढत होणार असून, अनेक प्रमुख पक्षांनी आघाड्या केल्या आहेत. शिवसेना (शिंदे गट), भाजप, रिपाइं यांची महायुती, तर उद्धव ठाकरे गट, मनसे आणि शरद पवार गट यांची आघाडी आहे. काँग्रेस, वंचित आणि रासप देखील स्वतंत्र आघाड्यांमध्ये लढत आहेत. अजित पवार गट अनेक ठिकाणी स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहे.
महाराष्ट्रातील आगामी पालिका निवडणुकांमध्ये राजकीय वातावरण तापले असून, विविध महापालिकांमध्ये बहुपक्षीय लढतींचे चित्र स्पष्ट झाले आहे. राज्यातल्या एकूण 29 पालिकांपैकी 11 ठिकाणी महायुती एकत्रितपणे लढणार आहे, तर 18 ठिकाणी प्रमुख पक्षांमध्ये थेट लढत पाहायला मिळणार आहे. मुंबई आणि ठाणे या प्रमुख महापालिकांमध्ये चौरंगी लढत निश्चित झाली आहे. मुंबई ठाण्यासह सर्व महापालिकांमध्ये ठाकरे बंधू अर्थात उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र लढणार असल्याचे संकेत मिळत आहेत. नाशिकमध्ये महाविकास आघाडी एकत्र असून, तिला मनसेची देखील साथ आहे. नवी मुंबई, सोलापूर, जालना आणि उल्हासनगरमध्ये महाविकास आघाडी एकत्रितपणे निवडणूक लढवणार आहे.
मुंबई महापालिकेत एकूण 227 जागा आहेत. येथे चौरंगी लढत अपेक्षित असून, मुख्य सामना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या पक्षांची युती विरुद्ध भाजप आणि शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना यांच्यात होणार आहे. भाजप, शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि रिपाइं यांची आघाडी झाली आहे. यात शिंदे गटाला 90 जागा, भाजपला 137 जागा मिळाल्या आहेत, तर रिपाइंला भाजपच्या कोट्यातून जागा देण्यात आल्या आहेत. दुसरीकडे, काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी आणि रासप यांनी देखील आघाडी केली आहे. काँग्रेस 139, वंचित बहुजन आघाडी 62 आणि रासप 10 जागांवर लढणार आहे. याशिवाय, उद्धव ठाकरेंची शिवसेना, मनसे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडी झाली आहे. या आघाडीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 164 जागा, मनसेला 53 जागा आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 10 जागा मिळाल्या आहेत. अजित पवार गट मात्र स्वतंत्रपणे अंदाजे 60 ते 70 जागांवर निवडणूक लढवणार आहे.