Maharashtra Rain : राज्यात पावसाचं धुमशान, रस्ते, गाड्या पीकांसह घरं पाण्यात; कुठं-कुठं झोडपलं?
राज्यामध्ये अहिल्यानगर, बुलढाणा, जालना, नाशिक तसेच सांगलीमध्ये पावसानं चांगलंच थैमान घातलं आहे. या मुसळधार पावसामुळे रस्ते आणि शेतीचं मोठं नुकसान झालंय.
मे महिन्यात महाराष्ट्र राज्यात झालेल्या अपेक्षेपेक्षा जास्त पावसामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे. मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे रस्ते, शेती आणि मालमत्ता यांचे व्यापक नुकसान झाले आहे. विशेषतः अहिल्यानगर, बुलढाणा, जालना आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये पावसाचा हाहाकार माजला आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात अहिल्यानगर तालुक्यातील खडकी, खंडाळा आणि अकोळनेर परिसरात ढगफुटी सारखा पाऊस झाला. वालुंबा नदीला पूर आला ज्यामुळे वाळकी गावातील पूल पाण्याखाली गेला आणि पुलाचा एक भाग वाहून गेला. नदीकाठची दुकानंही वाहून गेली आणि खंडाळा गावातील शेतीचे मोठे नुकसान झाले. जोरदार पाऊस आणि वाऱ्यामुळे पीकं आणि विजेचे खांब भुईसपाट झाले. अकोले तालुक्यातील आंबित धरण ओव्हरफ्लो झाले. बुलढाणा जिल्ह्यात पश्चिम विदर्भाची जीवनवाहिनी असलेली पूर्णा नदी मे महिन्यातच प्रवाहित झाली. नदीकाठी असलेल्या विटभट्टी परिसरात पाणी शिरले आणि शेवगाव ते संग्रामपूर रस्त्यावर झाडे उन्मळून पडली. अनेक ठिकाणी विद्युत खांब आणि तारा रस्त्यावर कोसळल्या.
तर जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यात ढगफुटी सारखा पाऊस बरसला. दुधना नदीला पूर आला आणि वाळेगाव, वाकुळणी गावात अतिवृष्टी झाली. धोपटेश्वर गावात एका शेतकऱ्याची विहीर आणि मोसंबीच्या फळबागांचेही प्रचंड नुकसान झाले. यासह नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अनेक हेक्टरवरच्या शेतीचे नुकसान झाले. येवला तालुक्यातील नेखेडा आणि निफाडमध्ये काढणीला आलेला कांदा पाण्यात भिजला. लासलगावमध्ये सलग दोन तास मुसळधार पाऊस झाला. तर इगतपुरी शहरातही जोरदार पाऊस पडला. या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
