Raj Thackeray : किमान ही अपेक्षा… राज्यातील 11 किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळांचा दर्जा, राज ठाकरे स्पष्टच म्हणाले…
युनेस्कोच्या यादीत या किल्ल्याचा सहभाग झाल्याने या निमित्ताने महाराजांच्या या महाराष्ट्रातील ११ किल्ल्यांचं किमान नीट संवर्धन होईल अशी अपेक्षा. एकदा युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला की त्या वास्तूचं संवर्धन, नूतनीकरण याचे खूप कडक निकष असतात ते पाळावे लागतील, पण त्यामुळे किमान महाराजांचे किल्ले तरी नीट राखले जातील, असं राज ठाकरे म्हणाले.
युनेस्कोच्या यादीत महाराष्ट्रातील एकूण ११ किल्ल्याचा समावेश करण्यात आल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक ट्वीट केले आहे. राज्यातील ११ किल्ल्याचं किमान नीट संवर्धन होईल, अशी अपेक्षा व्यक्त करत केवळ आनंद साजरा करू नये तर सरकारनं जबाबदारीचं भान ठेवावं, असं राज ठाकरे यांनी म्हटले आहे. तर कोणातीही जात-धर्म न पाहता सर्वप्रथम या सर्व गडकिल्ल्यांवरची जी काही अनधिकृत बांधकामं आहेत ती तात्काळ पाडून टाका, अशी मागणीही राज ठाकरेंनी केली आहे.
राज ठाकरे आपल्या पोस्टमध्ये म्हणाले, महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या १२ किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांचा दर्जा दिला आहे. ही अतिशय आनंदाची बाब आहे. आता राज्य सरकारला या किल्ल्यांच्या संवर्धनासाठी निधी उपलब्ध होईल आणि राज्याने देखील उत्तम निधी उपलब्ध करून द्यावा. आत्तापर्यंतच्या एकूण एक सरकारांनी गडकिल्ल्यांची जी दुरवस्था करून ठेवली होती त्यामुळे जगाला बोलावून हे किल्ले दाखवावे, आपल्या महाराजांचं, महाराष्ट्राचं वैभव दाखवावं अशी परिस्थिती नव्हती ती आता बदलेल अशी आशा व्यक्त करतो. फक्त सरकारला एक आठवण करून द्यावीशी वाटते ती म्हणजे युनेस्कोने जागतिक वारसा दर्जा दिला म्हणून युनेस्कोसारख्या संस्थांना गृहीत धरता येत नाही. जर निकष नीट नाही पाळले तर युनेस्को हा दर्जा काढून घेतं, याची आत्तापर्यंतची दोनच उदाहरणं आहेत पण ती आहेत हे विसरू नका.
