Raj Thackeray Mira Bhayandar Sabha LIVE : माझ्या सारखा कडवट.. हिंमत असेल तर.. ; राज ठाकरेंचं सरकारला ओपन चॅलेंज
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज मीरा भाईंदरमधून मराठी भाषेचा मुद्दा उचलून धरत सरकारवर टीका केली.
आम्ही हिंदू आहोत, हिंदी नाही. हिंदुत्वाच्या बुरख्या खालून माझी मराठी संपवायला येणार असाल तर माझ्या सारखा कडवट मराठी सापडणार नाही. हिंमत असेल तर हात लावून दाखवा, असं चॅलेंजच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सरकारला दिलं आहे. मराठी भाषेचाच्या मुद्द्यावर आज राज ठाकरेंची तोफ मीरा भाईंदरमधून पुन्हा एकदा धडाडली. यावेळी ठाकरेंनी भाजप सरकारला चांगलंच धारेवर धरलं.
आपल्या भाषणात राज ठाकरे म्हणाले की, पहिल्यांदा भाषा नीट समजून घेतली पाहिजे. मराठी भाषेचा इतिहास समजून घेतला पाहिजे. यांचं भाषेवर प्रेम नाही. माझं सर्व भाषेवर प्रेम आहे. महाराष्ट्रातील जे काही नेते आहेत त्यांच्या पेक्षा माझं हिंदी बरं आहे. त्याचं कारण माझे वडील. माझ्या वडिलांना व्याकरणासकट मराठी, हिंदी, इंग्रजी आणि ऊर्दू येत होतं. भाषा कोणतीही वाईट नसते. हिंदी वाईट भाषा नाही. आमच्यावर लादणार असाल तर नाही बोलणार जा. लहान मुलांवर तर नाहीच नाही. काही विषयच येत नाही. यांचं राजकारण काय चालू आहे ते पहिलं पाहा. हे सर्व षडयंत्र समजून घ्या. मुंबईला हात लावायचं असेल तर सर्व मतदारसंघ यांना अमराठी लोकांचे करायचे आहेत. हे गेले २० वर्ष मी बोंबलून सांगतोय. नुसती माणसं येत नाही. इमारती उभ्या राहतात आणि माणसं येतात. नुसती माणसं येत नाही. हे मतदारसंघ बनवत आहे. मतदारसंघ बनवून तुम्हाला हटवणार. आमचाच आमदार, खासदार आणि महापौर आणि हा सर्व पट्टा गुजरातला मिळवण्यासाठीचे खटाटोप सुरू आहे. हे आज नाही. पूर्वीपासून सुरू आहे. आता या लपूनछपून हळूवारपणे सुरू आहे. हे षडयंत्र नीट ओळखा समजून घ्या, सहज आलेला हा माज नाही. तुमच्या अंगावर येतात आणि मराठी बोलणार नाही हे सागंतात हा माज तिथून आला आहे, अशी तिखट टीका देखील यावेळी राज ठाकरेंनी केली.
