Pratap Sarnaik : महाराष्ट्राच्या मंत्र्याला हिंदी लाडकी अन् मराठी दोडकी? असं काय म्हटलं की सापडले वादात?
महाराष्ट्रात हिंदी भाषेवरून सुरू असलेल्या वादात, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या विधानाने वादळ निर्माण झाले आहे. त्यांनी हिंदी ही मुंबईची बोलीभाषा असल्याचे सांगून वाद ओढावून घेतला आहे.
हिंदी भाषा ही मुंबईची बोलीभाषा बनली आहे, असं वक्तव्य मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलंय. मिरा-भाईंदरमध्ये प्रवेश केला की मी हिंदीत बोलतो, असं म्हणत हिंदी भाषा म्हणजे आमची लाडकी बहीण असल्याचेही मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलंय. प्रताप सरनाईक यांनी केलेल्या वक्तव्यानंतर ते वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. अशातच ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर निशाणा साधला आहे.
राऊत म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी लोकांच्या उद्धारासाठी, कल्याणासाठी शिवसेना स्थापन केली, जेणेकरून ते मराठी लोक म्हणून स्वाभिमानाने पुढे जाऊ शकतील आणि हे लोक आता म्हणतात की आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे वारस आहोत. त्यांचे जे कोणी नेते आहेत त्यांना विचारावं मराठी भाषेसंदर्भात हा विचार आणि भूमिका हीच तुमची मुख्य भूमिका आहे का? असा सवालही राऊतांनी केला. तर त्यांना जे वाटते ते भाजपचे विचार आहेत. मी वारंवार म्हणतो की त्यांच्या पक्षाचे नेते आणि प्रमुख अमित शाह आहेत. त्यामुळे हे लोकं शाह जे म्हणतात तेच बोलतात, असं म्हणत टोला लगावला.
