Mumbai Local Train : पश्चिम आणि हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे वाहतूक पूर्वपदावर
Local Train Time Table Updates : मुसळधार पावसाने सोमवारी काहीकाळ ठप्प झालेली लोकल रेल्वेची वाहतूक आज सुरळीत सुरू झाली आहे.
मुंबईतील लोकल वाहतूक ही आज सुरळीत सुरू आहे. पश्चिम आणि हार्बर मार्गावरील लोकल ही सुरळीत सुरू आहे. तर मध्य रेल्वेची वाहतूक देखील नेहमीप्रमाणे 10 ते 15 मिनिटं उशिराने सुरू आहे.
मुंबईत काल पहाटेपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका मुंबईची लाईफलाइन मानल्या जाणाऱ्या लोकल सेवेला देखील बसला होता. रेल्वे रुळांवर साचलेल्या पाण्यामुळे लोकल सेवा काहीकाळ ठप्प झाली होती. तर त्यानंतर देखील सर्व मार्गावरील लोकल धीम्या गतीने सुरू होत्या. त्यामुळे चाकरमान्यांचे हाल झाले होते. मात्र काल संध्याकाळनंतर पावसाने विश्रांती घेतल्याने सखल भागात तसंच रेल्वे रुळांवर साचलेल्या पाण्याचा निचरा झाला असल्याने आज लोकल सेवा ही पूर्ववत झालेली बघायला मिळाली आहे. हार्बर तसंच पश्चिम मार्गावरील लोकल या वेळेवर धावत असून मध्य मार्गावरील लोकल सेवा ही नेहेमीप्रमाणे दहा ते पंधरा मिनिट उशिराने सुरू आहे.
दरम्यान, पावसाने विश्रांती घेतलेली असली तरी मुंबई आणि उपनगरांत ढगाळ वातावरण बघायला मिळत आहे. हवामान खात्याकडून देखील पुढील काही तास अतिवृष्टी होणार असून सतर्कतेचा इशारा दिला आहे.
