Mumbai Zoo Tiger Deaths : राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय? शक्ती अन् रूद्रचा जीव गेला कसा?
मुंबईतील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानातील शक्ती आणि रुद्र या दोन वाघांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. प्रशासनाने हे मृत्यू लपवून ठेवल्याचा आरोप प्राणीप्रेमींनी केला आहे. शक्तीचा मृत्यू निमोनियाने झाल्याचे प्रशासनाने म्हटले असले तरी, हाड अडकून गुदमरल्याने मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे. रुद्रचा मृत्यू संसर्गाने झाल्याचे सांगितले जात आहे.
मुंबईतील भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. उद्यानातील शक्ती आणि रुद्र या दोन वाघांचा मृत्यू झाला असून, या घटनेवरून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. प्राणीप्रेमींनी प्रशासनावर वाघांच्या मृत्यूची माहिती लपवून ठेवल्याचा गंभीर आरोप केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शक्ती नावाच्या वाघाचा मृत्यू 17 नोव्हेंबर रोजी झाला, तर रुद्र नावाच्या वाघाचा मृत्यू 29 ऑक्टोबर रोजी झाला होता. प्रशासनाने शक्तीचा मृत्यू निमोनियाच्या संसर्गामुळे झाल्याचे म्हटले असले तरी, श्वसन नलिकेत हाड अडकल्याने गुदमरून त्याचा मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे. रुद्रचा मृत्यू संसर्गामुळे झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, या दोन्ही मृत्यूंची अधिकृत घोषणा उशिरा करण्यात आली. शक्तीच्या मृत्यूचे निवेदन 26 नोव्हेंबरला, तर रुद्रच्या मृत्यूची घोषणा 4 डिसेंबरला झाली, ज्यामुळे प्रशासनाच्या पारदर्शकतेवर संशय व्यक्त केला जात आहे.
