Tapovan Tree Felling : …तोपर्यंत झाडं कापता येणार नाही, नाशिक तपोवनमधील वृक्षतोडीला राष्ट्रीय हरित लवादाकडून स्थगिती
नाशिकमधील तपोवन येथील प्रस्तावित वृक्षतोडीला राष्ट्रीय हरित लवादाने अंतरिम स्थगिती दिली आहे. न्यायिक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत झाडे तोडता येणार नाहीत, अशी माहिती याचिकाकर्ते श्रीराम पिंगळे यांनी दिली. लवादाने वृक्षतोडीच्या गरजेबाबत सविस्तर अहवालही मागवला आहे.
नाशिकमधील तपोवन येथील प्रस्तावित वृक्षतोडीला राष्ट्रीय हरित लवादाने (NGT) मोठा धक्का दिला आहे. लवादाने या वृक्षतोडीला अंतरिम स्थगिती दिली असून, न्यायिक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत तपोवनमध्ये कोणतीही वृक्षतोड करता येणार नाही, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. ही महत्त्वाची माहिती याचिकाकर्ते श्रीराम पिंगळे यांनी दिली. नाशिकमधील तपोवन येथील वृक्षतोडीला अनेक महिन्यांपासून विविध स्तरांतून तीव्र विरोध होत होता. नागरिकांनी, पर्यावरणप्रेमींनी या विरोधात मोठ्या प्रमाणावर आंदोलने केली होती.
राष्ट्रीय हरित लवादाने दिलेल्या आदेशानुसार, नाशिक महानगरपालिकेला न्यायिक प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय एकही झाड तोडण्यास मनाई करण्यात आली आहे. लवादाने या प्रकरणी गांभीर्याने दखल घेत काही महत्त्वपूर्ण सूचनाही केल्या आहेत. यामध्ये, प्रस्तावित वृक्षतोडीची नेमकी गरज काय आहे, यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या आहेत आणि वृक्षांची गणना (ट्री सेन्सस) करण्यात आली आहे का, या सर्व बाबींचा एक सविस्तर अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देश एका समितीला दिले आहेत. याचिकाकर्त्यांनाही या अहवालाची नोटीस देण्याचे आदेश लवादाने दिले आहेत. हा निर्णय तपोवनातील पर्यावरणाच्या रक्षणासाठी एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
