Dhananjay Munde : …म्हणून मंत्रीपद गेलं असतानाही मुंडेंनी सरकारी बंगला सोडला नाही, हे एकच कारण… बघा काय दिलं स्पष्टीकरण?
मंत्रीपद गेल्यानंतर आणि मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर साडेचार महिने लोटले तरही अद्याप बंगल्याचा ताबा धनंजय मुंडे यांनी सोडला नाही. तर शासकीय बंगल्यांच्या ताबा सोडण्यास विलंब झाल्यामुळे त्यांच्यावर मोठा दंडही लावण्यात आला आहे.
राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी अद्याप आपला शासकीय बंगला सोडलेला नाही, ज्यामुळे सध्याचे मंत्री छगन भुजबळ यांना सरकारी निवासस्थान सातपुडा हे मिळू शकलेले नाहीये. मिळालेल्या माहितीनुसार, धनंजय मुंडे यांनी मुलीची शाळा मुंबईत असल्याचे आणि स्वतःच्या आजारपणाचे कारण दिल्याचे सांगितले. तर माझ्यावर सध्या उपचार सुरू आहेत आणि मुंबईत घर नसल्याने बंगला सोडला नसल्याचे स्पष्टीकरण धनंजय मुंडे यांच्याकडून देण्यात आलं आहे.
दरम्यान, राजीनामा दिल्यानंतरही त्यांनी आपला शासकीय बंगला अद्याप सोडलेला नाही. सरकारी नियमांनुसार, मंत्रिपद गेल्यावर १५ दिवसांच्या आत सरकारी बंगला रिकामा करणे बंधनकारक असते. मुंडे यांनी या नियमाचे पालन न केल्यामुळे त्यांच्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मोठा दंड लावण्यात आला आहे, जो आता ४२ लाख रुपयांपर्यंत पोहोचला असल्याचे वृत्त आहे. या प्रकरणी, अंजली दमानिया यांनी सरकारला ४८ तासांची नोटीस पाठवून बंगला खाली करण्याची आणि दंडाची रक्कम वसूल करण्याची मागणी केली आहे.
