जहागिरी गेली पण..; गाडी जाळण्याचा व्हिडीओ शेअर करत रोहित पवारांची सरकारवर आगपाखड
बार्शी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष शांताराम जाधवर यांची गाडी जाळण्याची धक्कादायक घटना घडली आहे.
बार्शी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष शांताराम जाधव यांची गाडी जाळण्याची धक्कादायक घटना घडली आहे. आमदार रोहित पवार यांनी या घटनेचा व्हिडीओ शेअर करत महायुती सरकारवर तीव्र टीका केली आहे.
रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर पोस्टमध्ये म्हटले, जहागिरी गेली पण फुगिरी गेली नाही, ही म्हण बार्शी तालुक्यात खरी ठरत आहे. विधानसभेत पराभूत झालेले माजी आमदारांचे पुत्र रणवीर राऊत यांनी राजकीय वैमनस्यातून शांताराम जाधवर यांना अत्यंत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली, जी इतकी खालच्या दर्जाची आहे की ती शेअर करणेही शक्य नाही. या शिवीगाळ प्रकरणाला महिना उलटण्यापूर्वीच रात्रीच्या वेळी जाधवर यांची गाडी जाळण्याचा गंभीर प्रकार घडला. ही गाडी कोणी आणि का जाळली, याचे उत्तर राज्याचे गृहमंत्रालय देणार आहे का? आज जाधवर यांची गाडी जाळली, उद्या त्यांचे घर जाळले गेले किंवा कुटुंबातील कोणाचा बळी गेला, तरच गृहमंत्रालयाला जाग येणार आहे का? की पोलिस दुसऱ्या संतोष देशमुख प्रकरणाची वाट पाहत आहेत? जर उद्या जाधवर कुटुंबाला काही झाले, तर याची संपूर्ण जबाबदारी सरकार आणि पोलीस प्रशासनावर असेल. मुख्यमंत्री महोदयांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी विनंती आहे, असं त्यांनी म्हंटलं आहे.
