Jayant Patil : मी जातोय, पण…; राष्ट्रवादीच्या बैठकीत फूल मेलोड्रामा, जयंत पाटील भावूक
मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत जोरदार नाट्य पाहायला मिळाले.
मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत जोरदार नाट्य पाहायला मिळाले. पक्षाचे नेते आणि मावळते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना भाषणादरम्यान भावना आवरल्या नाहीत. गेल्या काही दिवसांपासून पाटील हे प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा सुरू होती, आणि त्यांनी आपल्या भाषणात याबाबत स्पष्ट संकेत दिले. त्यांनी नव्या प्रदेशाध्यक्षांच्या मागे ठामपणे उभे राहण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले.
भावुक होताना पाटील म्हणाले, मी कधीही स्वतःची ‘जयंत पाटील संघटना’ किंवा ‘जयंत पाटील फाऊंडेशन’ तयार केले नाही. माझी स्वतःची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न मी कधी केला नाही. पक्षासाठी काम करताना माझ्याविरोधात अनेक कारवाया झाल्या, पण मी त्यांना उत्तर दिले नाही. शरद पवार साहेबांनी दिलेल्या आदेशांचे मी दबाव न घेता पालन केले.
पुढे ते म्हणाले, आमच्या चुका सुप्रिया सुळे यांनी पोटात घेतल्या. हा अंत नाही, तर एका नव्या पर्वाची सुरुवात आहे. मी मुख्य सेनापती होतो, पण सेना अजूनही सज्ज आहे. मी जात आहे, पण पक्षाला सोडत नाही. माझे नाव असो वा नसो, माझ्या कामातून मला ओळख मिळेल, कारण मी जयंत आहे. या भावनिक भाषणाने उपस्थितांवर खोल परिणाम झाला.
