दोन्ही पवारांच्या वर्चस्वाला सर्वात मोठे हादरे! साखर वाटूनही बिघडलं घड्याळ
पुण्याच्या विकासासाठी भाजपविरोधात एकत्र आलेल्या दोन्ही पवार गटांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मोठे हादरे बसले आहेत. पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादींना अपेक्षित यश मिळाले नाही, ज्यामुळे एकेकाळी त्यांची मजबूत पाळेमुळे असलेल्या या शहरांमध्ये त्यांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. निष्ठावंतांच्या नाराजीकडे दुर्लक्ष करणे महागात पडले.
महाराष्ट्राच्या विकासासाठी भाजपासोबत सत्तेत सहभागी झालेले अजित पवार यांनी, पुण्याच्या विकासासाठी भाजपविरोधात शरद पवारांसोबत युती केली होती. निष्ठावंतांनी या युतीला विरोध केला असतानाही त्यांना डावलण्यात आले. मात्र, निवडणूक निकालांनी दोन्ही पवारांच्या वर्चस्वाला मोठे धक्के दिले. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये मतदारांनी दोन्ही राष्ट्रवादींना नाकारले.
पिंपरी चिंचवड महापालिकेतून शरद पवारांची राष्ट्रवादी अक्षरशः हद्दपार झाली, तर पुण्यात त्यांना केवळ दोन नगरसेवक मिळवता आले. अजित पवारांनी राष्ट्रवादीला राष्ट्रीय दर्जा मिळवून देण्याचा वायदा केला असला तरी, पुण्यातच पक्षाला अस्तित्वाची लढाई लढावी लागली. तुतारी चिन्हासह लढलेल्या शरद पवार गटाला नाशिक, सोलापूर, मालेगावसह २० महापालिकांमध्ये एकही नगरसेवक जिंकता आला नाही. अजित पवारांच्या राष्ट्रवादीलाही जालना, मीरा-भाईंदरसह सात महापालिकांमध्ये भोपळाही फोडता आला नाही. दोन्ही गटांच्या एकजुटीनंतरही त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही, ही त्यांच्यासाठी गंभीर बाब आहे.