चपला-बूटांचा खच अन् फलाटावर बॅगांसह कपडेच कपडे, ‘त्या’ चेंगराचेंगरीतल्या 18 बळींना जबाबदार कोण?

चपला-बूटांचा खच अन् फलाटावर बॅगांसह कपडेच कपडे, ‘त्या’ चेंगराचेंगरीतल्या 18 बळींना जबाबदार कोण?

| Updated on: Feb 17, 2025 | 11:56 AM

दिल्लीहून कुंभमेळ्याला जाणाऱ्या रेल्वे स्टेशनवरच्या चेंगराचेंगरीमध्ये १८ लोकांचा बळी गेला आहे. ही दुर्घटना नेमकी का घडली? याला जबाबदार कोण? यावरून आरोप प्रत्यारोप होऊ लागलेत.

कुंभमेळ्याला प्रयागराजमधल्या चेंगराचेंगरीनंतर आता दिल्ली स्टेशनवरच्या चेंगराचेंगरीत काल संध्याकाळपर्यंत १८ लोकांचे जीव गेलेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. प्राथमिक दृष्ट्या खराब नियोजनामुळे १८ लोकांचा बळी गेल्याचं बोललं जातंय. प्रयागराजच्या कुंभमेळ्याला जाण्यासाठी काल संध्याकाळपासून दिल्ली स्टेशनवर गर्दी जमत होती. मात्र गर्दीच्या तुलनेत कोणतीही खबरदारी घेतली नाही. त्याचा परिणाम म्हणजे काल रात्री १०च्या दरम्यान चेंगराचेंगरी होऊन अनेकांचे जीव गेले. कुठे लोकांच्या चपला-बूटांचा खच होता, तर कुठे फलाटावर बॅगा आणि कपडे पसरले होते. आरोपानुसार अनियंत्रित गर्दी आणि रेल्वे अनाउन्समेंटच्या गोंधळामुळे ही दुर्घटना घडली. दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार प्रयागराज नावाच्या दोन ट्रेन सोडण्यात आल्यामुळेच हा गोंधळ तयार झाला. एक ट्रेन होती प्रयागराज एक्स्प्रेस आणि दुसऱ्या ट्रेनचं नाव होतं प्रयागराज स्पेशल ट्रेन.

दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार रात्री १०च्या दरम्यान दिल्ली रेल्वे स्थानकावर प्रयागराजकडे जाणाऱ्या एकूण पाच ट्रेन होत्या. प्लॅटफॉर्म १२ वर मगध एक्स्प्रेस येणार होती जीला थोडा उशीर झाला होता. प्लॅटफॉर्म १३ वर स्वातंत्रता सेनानी एक्स्प्रेस येण अपेक्षित होतं, ती देखील उशिराने धावत होती. प्लॅटफॉर्म १४ वर प्रयागराज एक्स्प्रेस उभी होती जी १० वाजून १० मिनिटांनी निघणार होती. प्लॅटफॉर्म १५ वर भुवनेश्वर एक्स्प्रेस येण अपेक्षित होतं मात्र तिला दिल्ली स्टेशनवर पोहोचण्यास उशीर झाला होता. यावेळी अचानक प्लॅटफॉर्म १६ वर प्रयागराज स्पेशल ट्रेन येत असल्याची अनाउन्समेंट झाली. आधीच गर्दी त्यात प्रयागराज एक्स्प्रेस आणि प्रयागराज स्पेशल या नावाने संभ्रम वाढला. १४ नंबरच्या प्लॅटफॉर्मसह अनेकांना असं वाटलं की आपलीच गाडी फलाट बदलून १६ वर येतेय ज्याचा परिणाम चेंगराचेंगरीत झाला आणि १८ लोक जीवाला मुकले.

Published on: Feb 17, 2025 11:56 AM