वन राहिलीच नाहीत तर वनमंत्री काय कामाचे? गणेश नाईकांच्या भूमिकेवर नीलेश राणे संतापले
नीलेश राणे यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्यावर मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या जंगलतोडीवरून तीव्र टीका केली आहे. जंगलतोडीमुळे वन्यजीवांना त्रास होत असून कोकणातील शेतकरीही त्रस्त आहेत. वनविभागात मनुष्यबळ आणि साधनांचा अभाव असल्याचे राणे यांनी म्हटले आहे. वनमंत्री गणेश नाईक केवळ टीआरपी मिळवण्यात व्यस्त असल्याचा आरोप त्यांनी केला.
नीलेश राणे यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करत टीका केली आहे. मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या जंगलतोडीबद्दल राणे यांनी चिंता व्यक्त केली असून, वन राहिलीच नाहीत तर वनमंत्री काय कामाचे? असा सवाल उपस्थित केला आहे.
राणे यांच्या मते, कोकण प्रदेशात मोठ्या प्रमाणावर जंगलतोड सुरू आहे, ज्यामुळे वन्यजीवांना त्रास होत असून अनेक ठिकाणी शेतकरी त्रस्त झाले आहेत. वनविभागात आवश्यक असलेले फॉरेस्ट ऑफिसर, पुरेसे इन्फ्रास्ट्रक्चर आणि साधनसामग्री यांचा अभाव आहे. तसेच, दुसऱ्या राज्यातील डीएफओ ग्रामीण भागासाठी उपयुक्त ठरत नसल्याचे त्यांनी नमूद केले.
राणे यांनी थेट प्रश्न केला आहे की, ही लाकूडतोड वनमंत्र्यांच्या परवानगीने सुरू आहे का? नवी मुंबईतील खाणकामाप्रमाणेच आता जंगलेही पोखरली जात आहेत. अनेक गावांना जोडणाऱ्या रस्त्यांसाठी वनविभाग परवानगी देत नसल्याने ग्रामीण भागातील विकास योजना वंचित राहत आहेत. हे विषय गंभीर असले तरी, वनमंत्री स्वतःला टीआरपी मिळवण्यात व्यस्त असल्याचे नीलेश राणे यांनी म्हटले आहे.
