विनाअट शस्त्रसंधी स्वीकारण्याचं कारण काय? ऑपरेशन सिंदूरवरून अरविंद सावंतांचा थेट सवाल

विनाअट शस्त्रसंधी स्वीकारण्याचं कारण काय? ऑपरेशन सिंदूरवरून अरविंद सावंतांचा थेट सवाल

| Updated on: Jul 28, 2025 | 6:10 PM

संसदेत ऑपरेशन सिंदूरवर सविस्तर चर्चा झाली. यावेळी विरोधी पक्षांनी ऑपरेशन सिंदूर आणि भारत-पाकिस्तान यांच्यातील शस्त्रसंधीच्या मुद्द्यावरून मोदी सरकारवर जोरदार टीका केली.

संसदेत ऑपरेशन सिंदूरवर सविस्तर चर्चा झाली. यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ऑपरेशन सिंदूर कसे राबवले गेले आणि त्यामुळे पाकिस्तानचे किती नुकसान झाले, याबाबत माहिती दिली. केंद्र सरकारने स्पष्ट केले की, पाकिस्तानच्या हल्ल्यांमुळे भारताचे फारसे नुकसान झालेले नाही. मात्र, विरोधी पक्षांनी ऑपरेशन सिंदूर आणि भारत-पाकिस्तान यांच्यातील शस्त्रसंधीच्या मुद्द्यावरून मोदी सरकारवर जोरदार टीका केली. खासदार अरविंद सावंत यांनी, भारताने पाकिस्तानसोबत विनाअट शस्त्रसंधी का स्वीकारली? असा थेट सवाल उपस्थित केला.

ऑपरेशन सिंदूरनंतर भारताने विविध देशांमध्ये आपले प्रतिनिधी पाठवले होते, ज्यांच्यावर या मोहिमेची सविस्तर माहिती देण्याची जबाबदारी होती. परंतु, ज्या देशांमध्ये हे प्रतिनिधी गेले, त्या एकाही देशाने संयुक्त पत्रकार परिषद घेऊन भारताच्या दहशतवादविरोधी मोहिमेला पाठिंबा असल्याचे जाहीर केले नाही. भारताच्या बाजूने कोणीही उभे राहिले नाही, अशी टीका अरविंद सावंत यांनी केली. तसेच, पाकिस्तानसोबत विनाअट शस्त्रसंधी करणे चुकीचे होते. हीच योग्य वेळ होती पाकव्याप्त काश्मीर परत घेण्याची. ऑपरेशनला ‘सिंदूर’ हे नाव देऊन भावनांशी खेळण्याचा प्रयत्न झाला, असा हल्लाबोल सावंत यांनी केला.

ते पुढे म्हणाले, आपले संरक्षण दलप्रमुख (सीडीएस) आत्मनिर्भरतेची गरज असल्याचे सांगतात. राष्ट्र म्हणून आपण सर्व एकजूट आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्याही निमंत्रणाविना पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांना भेटण्यासाठी लाहोरला भेट दिली होती. तिथे त्यांनी लाहोरच्या रेल्वेविषयी चर्चा केली. तेव्हा बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते, ‘पाकिस्तान हा सापासारखा आहे; त्याला कितीही दूध पाजले तरी तो विषच ओकेल.’ बाळासाहेबांचे हे शब्द आज खरे ठरत असल्याचंही सावंत यांनी म्हंटलं.

Published on: Jul 28, 2025 06:10 PM