ती कौटुंबिक मुलाखत, त्यावर .. ; मंत्री प्रताप सरनाईकांचा ठाकरेंवर हल्लाबोल
शिवसेना (शिंदे गट) नेते आणि मंत्री प्रताप सरनाईक यांनी उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर टीका केली आहे.
शिवसेना (शिंदे गट) नेते आणि मंत्री प्रताप सरनाईक यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ‘सामना’च्या मुलाखतीवर टीका केली. ते म्हणाले, उद्धव ठाकरेंची मुलाखत म्हणजे कौटुंबिक मुलाखत आहे. काय प्रश्न विचारायचे आणि काय उत्तरे द्यायची, हे सर्व आधीच ठरलेले असते. त्यामुळे यावर बोलणे टाळलेलेच बरे. उद्धव ठाकरे यांनी मुलाखतीत निवडणूक आयोगाला ‘शेंदूर फासलेला धोंडा’ म्हटल्याबाबत विचारले असता, सरनाईक यांनी ही टीका केली. तसेच, ते म्हणाले की, महायुती सरकार, मग ते ‘दगड असो वा धोंडे’, जनतेची कामे करत राहील.
हरित धाराशिव उपक्रमासाठी धाराशिव येथे आले असताना सरनाईक यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ठाकरे कुटुंबावर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, ठाकरे कुटुंबाकडे 25 वर्षे मुंबईची सत्ता होती आणि अडीच वर्षे राज्याची सत्ता होती, तरी त्यांनी काहीच केले नाही. मराठी माणसाला मुंबईतून बाहेर काढण्याचे कारस्थान त्यांच्याच अनुयायांनी रचले. मराठीच्या मुद्द्यावरून सरनाईक यांनी ठाकरे कुटुंबाला लक्ष्य केले.
