Pune AB Form Controversy: एका उमेदवारानं दुसऱ्या उमेदवाराचा AB फॉर्म खाल्ला, पुण्यात शिंदे सेनेतील उमेदवाराची चर्चा
पुण्यात शिंदे गटाच्या शिवसेनेतील उमेदवार उद्धव कांबळे यांच्यावर प्रतिस्पर्ध्याचा एबी फॉर्म फाडल्याचा आरोप आहे. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला असून, त्यांनी मच्छिंद्र ढवळे यांचा एबी फॉर्म खाल्ल्याचा आरोप फेटाळला आहे. फॉर्म अनवधानाने फाटल्याची कबुली देत, निवडणूक आयोगावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
पुणे येथे शिंदे गटाच्या शिवसेनेतील उमेदवार उद्धव कांबळे यांच्यावर निवडणुकीतील एबी फॉर्म फाडल्याचा आरोप झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. कांबळे यांनी मच्छिंद्र ढवळे यांचा एबी फॉर्म “खाल्ल्याचा” आरोप होतो आहे. या प्रकरणी उद्धव लहू कांबळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात बोलताना उद्धव कांबळे यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. मच्छिंद्र ढवळे यांना आपण ओळखत नसून, त्यांचा शिवसेनेशी कोणताही संबंध नाही असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, फॉर्म खाल्ल्याचा आरोप चुकीचा असून, निवडणूक आयोगाच्या कार्यालयात गर्दीच्या वेळी आणि भावनिक अवस्थेत तो अनवधानाने फाटला गेल्याची कबुली त्यांनी दिली. निवडणूक आयोगाने सुरुवातीला दुसरा फॉर्म नसल्याचे सांगितल्याने त्यांना धक्का बसला. आपण शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार असून, हा विरोधकांनी केलेला कट असल्याचा दावा कांबळे यांनी केला आहे. त्यांनी वैद्यकीय तपासणीची मागणी केली आहे.
