Ravindra Dhangekar : पुणे मनपा निवडणुकीवरून महायुतीत खडाजंगी, धंगेकरांचा भाजपवर निशाणा अन् दिला थेट इशारा

| Updated on: Dec 29, 2025 | 11:06 AM

पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या जागावाटपावरून महायुतीत मोठा वाद निर्माण झाला आहे. रवींद्र धंगेकरांनी भाजपवर नाराजी व्यक्त करत प्रभाग २४ मधील जागेसाठी मुलगा आणि पत्नीला अपक्ष उमेदवारी देण्याचा इशारा दिला आहे. शिंदेंच्या शिवसेनेत अंतर्गत नाराजी असून, स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार मिळावेत अशी धंगेकरांची मागणी आहे.

पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या जागावाटपावरून महायुतीत सध्या जोरदार खडाजंगी सुरू आहे. विशेषतः शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी भाजपवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. प्रभाग क्रमांक २४ वरील जागेवरून भाजपने दावा सोडण्यास नकार दिल्याने धंगेकरांनी आपल्या मुलाला प्रणव धंगेकर आणि पत्नी प्रतिभा धंगेकर यांना अपक्ष म्हणून रिंगणात उतरवण्याची तयारी केली आहे. धंगेकरांनी भाजपला आव्हान देत शिवसैनिक लाचार होऊन युती करणार नाहीत, असा स्पष्ट इशारा दिला आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार देण्याची मागणी केली आहे. दुसरीकडे, भाजपकडून सन्मानजनक जागा न मिळाल्यास शिंदेंची शिवसेना अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे महायुतीतील मतभेद तीव्र झाले असून, यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांची बैठक अपेक्षित आहे.

Published on: Dec 29, 2025 11:06 AM