महाराष्ट्रातले 45 खासदार गप्प बसले, पण ..; राज ठाकरेंचं वर्षा गायकवाड यांना पत्र
राज ठाकरे यांनी काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांना पत्र लिहून त्यांचे कौतुक केले आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांना पत्र लिहून त्यांचे कौतुक केले आहे. लोकसभेच्या अधिवेशनादरम्यान महाराष्ट्रातील खासदारांनी भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांना घेराव घालत त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली होती. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी वर्षा गायकवाड यांना पत्र लिहिले आहे. दुबे यांनी “मराठी माणसाला आपटून आपटून मारू” अशी आक्षेपार्ह वक्तव्य केली होती.
राज ठाकरे यांनी पत्रात लिहिले, मराठी माणसाचा, महाराष्ट्राचा आणि मराठी भाषेचा अपमान करणाऱ्या निशिकांत दुबे यांना तुम्ही संसदेत घेराव घालून जाब विचारला, याबद्दल तुमचे मनःपूर्वक अभिनंदन. आतापर्यंत मराठी माणसावर अन्याय आणि अपमान होत असताना महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे खासदार गप्प बसत असल्याचे चित्र जनतेच्या समोर येत होते. तुम्ही तुमच्या कृतीने या चित्राला छेद दिला. यासाठी तुमचे मनापासून आभार.
