मनसेला युतीची साद? आठवलेंना आला राग; ‘लाडक्या बहिणी’वरूनही दिला घरचा आहेर, ‘पैसे संपत आले म्हणून….’
महायुतीमध्ये आम्ही असताना मनसेची गरजच काय? असा सवाल रिपाई अध्यक्ष रामदास आठवले यांनी केला आहे आणि याशिवाय तिजोरीतले पैसे संपत आलेत म्हणून लाडक्या बहिणींना निकषाचे नियम लागलेत असा घरचा आहेर देखील त्यांनी आपल्या सरकारला दिलेला आहे.
महायुतीमध्ये आम्ही असताना मनसेची गरजच काय? असा सवाल रिपाई अध्यक्ष रामदास आठवले यांनी केला आहे आणि याशिवाय तिजोरीतले पैसे संपत आलेत म्हणून लाडक्या बहिणींना निकषाचे नियम लागलेत असा घरचा आहेर देखील त्यांनी आपल्या सरकारला दिलेला आहे. आरपीआय महायुतीसोबत असताना मनसेची गरज काय? असा सवाल करत रामदास आठवले यांनी मनसे सोबतच्या संभाव्य युतीला विरोध केला आहे. इतकंच नाही तर महायुतीमध्ये असूनही आम्हाला आत्ताच काही मिळत नाही त्यात मनसे आल्यावर काय मिळणार? असा टोलाही आठवले यांनी लगावला आहे. मनसेला महायुतीमध्ये घेण्यास आठवले यांचा सुरुवातीपासूनच विरोध आहे. काही दिवसांपूर्वी उदय सामंत राज ठाकरेंच्या भेटीला पोहोचल्यानंतर युतीच्या चर्चा पुन्हा जोर धरला होता. मात्र यावेळी आठवले यांनी फक्त मनसेला विरोधच नाही तर लाडक्या बहिणींवरूनही आपल्याच सरकारला घरचा आहेरही दिलाय. ‘लाडक्या बहिणीसाठी जे काही नियम बनवलेले त्या नियमांमध्ये बसणाऱ्यांना ते २१०० रुपये मिळणार आहेत. सुरुवातीला १५०० रुपये मिळत होते. त्यामुळे ज्या अपात्र महिला असतील त्या अपात्र महिलांचा आता विषय नाही. पण ज्या अपात्र महिला आहेत त्यांचे पैसे मात्र थांबू नये त्यांना वेळोवेळी पैसे दिले पाहिजेत अशी आपली भूमिका आहे. नियम लावले म्हणजे आता पैसे कमी आहेत म्हणून..’, असं म्हणत आठवलेंनी सरकारलाच खोचक सवाल केलाय.
