Ravindra Dhangekar : मोहोळानंतर धंगेकरांचा निशाणा आता कोणावर? भाजपचा तिसरा नेता रडारवर
पुण्यातील लोकमान्य नगर पुनर्विकास प्रकल्पाला आमदार हेमंत रासणे यांनी स्थगिती आणल्याचा गंभीर आरोप आमदार रविंद्र धंगेकर यांनी केला आहे. धंगेकरांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून रहिवाशांना न्याय देण्याची मागणी केली असून आंदोलनाचा इशारा दिला आहे. हेमंत रासणे यांनी मात्र एकात्मिक विकासाची भूमिका मांडत आरोपांचे खंडन केले.
आमदार रविंद्र धंगेकर यांनी पुण्यातील भाजप आमदार हेमंत रासणे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. चंद्रकांत पाटील आणि मुरलीधर मोहोळ यांच्यानंतर रासणे हे धंगेकरांच्या रडारवर आलेले तिसरे भाजप नेते आहेत. धंगेकर यांच्या मते, पुणे शहरातील लोकमान्य नगर येथील स्वयं पुनर्विकास प्रकल्पाला हेमंत रासणे यांनी स्थगिती आणली आहे. रहिवाशांनी घराचे स्वप्न पाहून बांधकाम सुरू केले असताना, रासणे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाऊन प्रकल्पाला स्टे आणल्याचा दावा धंगेकरांनी केला आहे.
म्हाडाने काही इमारतींच्या पुनर्विकासाला मान्यता दिली होती, मात्र काही इमारतींना स्थानिक आमदारांच्या हस्तक्षेपामुळे मान्यता मिळाली नसल्याचा आरोपही त्यांनी केला. या प्रकरणी धंगेकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले असून, रहिवाशांना न्याय देण्याची मागणी केली आहे. तसेच लवकरच आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे. या आरोपांवर हेमंत रासणे यांनी स्पष्टीकरण दिले आहे की, त्यांचा प्रकल्पाला विरोध नाही, परंतु हा प्रकल्प एकात्मिक पद्धतीने व्हावा अशी त्यांची भूमिका आहे, जेणेकरून त्या भागाचा चांगला विकास होऊ शकेल.
