Rohit Arya Case : तर केसरकर जबाबदार असतील, एन्काऊंटरमध्ये जीव गमावलेल्या रोहित आर्याच्या नोटमध्ये काय ?
मुंबईतील पवई येथे 17 मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्याचा पोलिसांच्या एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला. पीएलसी स्वच्छता मॉनिटर प्रकल्पाचे 2 कोटी थकवल्याचा आर्याचा आरोप होता, ज्यासाठी त्याने तत्कालीन शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना जबाबदार धरले होते.
मुंबईतील पवई येथील आर ए स्टुडिओमध्ये 17 मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्याचा पोलिसांच्या एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला. ही घटना दुपारी 1 ते 4 वाजेदरम्यान घडली, जिथे आर्याने सुमारे तीन तास मुलांना डांबून ठेवले होते. मिळालेल्या माहितीनुसार, पवई पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल वाघमारे यांनी केलेल्या गोळीबारात रोहित आर्याच्या छातीच्या डाव्या बाजूला गोळी लागली आणि त्याला रुग्णालयात मृत घोषित करण्यात आले.
रोहित आर्याच्या कृतीमागे सरकारकडून पैसे थकवल्याचा आरोप होता. मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानातील पीएलसी स्वच्छता मॉनिटर प्रकल्पासाठी केलेल्या कामाचे सरकारने 2 कोटी रुपये दिले नसल्याचा त्याचा दावा होता. 2024 मध्ये केलेल्या उपोषणावेळीही रोहित आर्याने शासनाविरोधात निवेदन देत, “मी आत्महत्या केली तर दीपक केसरकर जबाबदार असतील” असे म्हटले होते. तत्कालीन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी त्यावेळी आर्या यांना सरकारच्या नियमानुसार पैसे दिले जातील असे सांगितले होते.