Jaya Bachchan : सिंदूर तर पुसलं गेलं मग…, ऑपरेशन सिंदूरवरून जया बच्चन यांचा सरकारवर निशाणा
सामान्य नागरिक काश्मीरला स्वर्ग मानतात आणि आता तिथे दहशतवाद नाही या आशेने तिथे जातात. परंतु या घटनेने परिस्थिती अजूनही पूर्णपणे नियंत्रणात नसल्याचे स्पष्ट झाले असे जया बच्चन म्हणाल्या .
राज्यसभेतील संसदीय अधिवेशनात आजही ऑपरेशन सिंदूरवर चर्चा झाल्याचे पाहायला मिळाले. ‘ऑपरेशन सिंदूर’वरील चर्चेदरम्यान समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. ऑपरेशन सिंदूरवर बोलताना त्यांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं. जया बच्चन यांनी या ऑपरेशनला ‘सिंदूर’ असे नाव देण्यास तीव्र आक्षेप घेतला. इतकंच नाहीतर संसदेत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित करत सरकारवर निशाणा साधला. पहलगाममध्ये एवढी मोठी दुर्घटना घडली, इतक्या लोकांना आपले प्राण गमवावे लागले, तेव्हा इतक्या दुःखद प्रसंगी ऑपरेशनला ‘सिंदूर’ असे नाव का देण्यात आले? असा सवाल जया बच्चन यांनी सभागृहात उपस्थित केला.
जया बच्चन यांनी आपल्या भाषणाची सुरुवात या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या सर्व पीडितांना श्रद्धांजली वाहून केली. त्या म्हणाल्या की, अमरनाथ यात्रेवर गेलेल्या यात्रेकरूंनी सरकारवर विश्वास ठेवून तिथे पाऊल ठेवले होते. कलम ३७० रद्द केल्यानंतर लोकांना आश्वासन देण्यात आले होते की आता काश्मीरमध्ये शांतता आहे, परंतु या हल्ल्याने तो विश्वास तोडला असल्याचे म्हणत त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला.
