अधिकाऱ्यांची विश्रांती अन् विनातपासणी वाहनांची संभाजीनगरात एन्ट्री!
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीपूर्वी स्थिर सर्वेक्षण पथके (एसएसटी) निष्क्रिय असल्याचे समोर आले आहे. पैठणकडून शहरात येणाऱ्या वाहनांची तपासणी होत नसून, अधिकारी व कर्मचारी कर्तव्यावर नसून विश्रांती घेत आहेत. यामुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, पैशाच्या गैरवापराची शक्यता वर्तवली जात आहे.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया उद्या पार पडणार असून, या पार्श्वभूमीवर शहरात आचारसंहितेचे पालन सुनिश्चित करण्यासाठी ठिकठिकाणी स्थिर सर्वेक्षण पथके (एसएसटी) स्थापन करण्यात आली आहेत. मात्र, पैठण शहराकडून छत्रपती संभाजीनगर शहराकडे जाणाऱ्या नक्षत्रवाडी परिसरातील एसएसटी पथकाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या ठिकाणी अनेक वाहने शहरात प्रवेश करत असतानाही कर्तव्यावर असलेले अधिकारी आणि कर्मचारी वाहनांची तपासणी करताना दिसत नाहीत. उलट, ते विश्रांती घेत असल्याचे समोर आले आहे. जर याच पद्धतीने एसएसटी पथके काम करत असतील, तर निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडणार का, असा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे.
शहराच्या सर्व बाजूंनी अशाच पद्धतीने एसएसटी पथके स्थापन करण्यात आली असली तरी, कोणतीही गाडी तपासली जात नसल्याचे चित्र आहे. जर निवडणूक विभागाने या प्रकाराकडे दुर्लक्ष केले, तर छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत आज, आज रात्री आणि उद्याही पैशाचा महापूर आल्यास आश्चर्य वाटणार नाही, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
