Sanjay Raut : सिगारेट, पैशांचे बंडल अन् शिंदेंचे मंत्री महोदय बेडवर… राऊतांच्या ‘त्या’ दाव्यानं राजकारणात खळबळ
संजय शिरसाट यांना आयकर विभागाकडून नुकतीच एक नोटीस पाठवण्यात आली होती. आयकरच्या या कारवाईमुळे शिंदे गटाला मोठा धक्का बसला होता. मात्र अशातच राऊतांनी शिरसाटांबद्दल मोठा दावा करत एक व्हिडीओ समोर केलाय.
आयकर विभागाची नोटीस आलेल्या मंत्र्याचा व्हिडीओ माझ्याकडे आहे, असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय. संजय राऊत यांनी केलेल्या दाव्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. हा खळबळजनक दावा करताना संजय राऊत म्हणाले, माझ्याकडे असलेल्या व्हिडीओत संबंधित मंत्री पैशांच्या बॅगा घेऊन बसलेत. दरम्यान, पैशांनी भरलेल्या बॅगांसह संजय शिरसाट यांचा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.
पुढे संजय राऊत असेही म्हणाले की, माझ्याकडे हा व्हिडीओ आला त्यात हे मंत्री महोदय पैशांची बंडलं भरलेली बॅग बाजूला घेऊन बसलेत. हे चित्रं, पुरावे सर्वत्र जातात. तुम्ही सरकारमध्ये आहात म्हणून तुम्हाला कोणी हात लावणार नाहीत, असा एक भ्रम असतो आणि तो काही काळ टिकतो. योग्य वेळ येताच हे पुरावे बाहेर येऊन त्यावर कारवाई होते त्यापासून कोणीही वाचू शकत नाही. त्यामुळे भविष्यात तुम्हाला अशाप्रकारच्या कारवाईला सामोरं जावं लागेल, असं राऊत म्हणाले.
