मीडियाने युतीच्या चर्चेला अल्पविराम द्यावा..; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर राज ठाकरेंनी केलेल्या ट्विटवर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राज ठाकरे-उद्धव ठाकरे यांच्यासंदर्भात सातत्याने प्रश्न विचारण्यापेक्षा महापालिका निवडणुकीनंतर काय होतं ते तुम्हाला दिसेल. राज ठाकरे यांची एक मी पोस्ट वाचली. ती वाचल्यावर त्यातले अर्थ आणि संदर्भ तुम्हाला कळायला हवे, असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पोस्टवर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, हवेत तीर मारण्यात काही अर्थ नाही. आम्ही युतीबाबत आशावादी आहोत. पाऊस पडत नसताना गडगडाट करू नये, असे मी आवाहन करतो. राऊत यांनी पुढे सांगितले की, लवकरच उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येऊन युतीबाबत घोषणा करतील. निवडणुका जाहीर झाल्यावर युतीचा निर्णय घेऊ, असे राज ठाकरे म्हणाले असतील तर त्यात काय चूक आहे? असा प्रतिप्रश्न त्यांनी पत्रकारांना विचारला. राज ठाकरे यांनी जर निवडणुकीनंतर युतीबाबत विचार करू असे म्हटले असेल, तर मीडियाने याला पूर्णविराम देण्याऐवजी अल्पविराम द्यावा. त्यांनी समाजमाध्यमांवरील राज ठाकरे यांच्या भूमिकेकडे लक्ष देण्याचे आणि ती समजून घेण्याचे आवाहनही केले.
