BMC Election 2025 : संजय राऊत पुन्हा ‘शिवतीर्थ’वर, राज ठाकरे यांच्यासोबत युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
संजय राऊत यांनी राज ठाकरे यांची शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतली. आगामी बीएमसी निवडणुका आणि जागावाटपाच्या मुद्द्यांवर ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. मनसे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्यातील संभाव्य युती आणि त्यातील जागावाटपाचा तिढा सोडवण्यावर या बैठकीत चर्चा झाली, ज्यामुळे राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतल्याने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका, विशेषतः बीएमसी निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या भेटीमागचा मुख्य उद्देश शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे यांच्यातील संभाव्य युती आणि जागावाटपाचा तिढा सोडवणे हा आहे. संजय राऊत यांच्या भेटीवेळी राज ठाकरे यांच्यासोबत मनसेचे प्रमुख नेते बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई देखील उपस्थित होते.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) च्या वतीने अनिल परब, वरुण सरदेसाई आणि सुरज चव्हाण हे जागावाटपाच्या बोलणीत सहभागी असल्याची माहिती आहे. मुंबईतील बहुतांश ठिकाणी दोन्ही पक्षांमध्ये जागावाटप सुरळीत झाल्याचे सांगितले जात असले तरी, काही विशिष्ट मतदारसंघांमध्ये अजूनही पेच कायम आहे. माहीम, शिवडी, विक्रोळी आणि भांडुप यांसारख्या मराठी भाषिक बहुल मतदारसंघांमध्ये जागावाटपाचा मुद्दा अजूनही अडकलेला आहे.
