Sanjay Raut Press : महाराष्ट्र आता गुंडाराष्ट्र झालंय, राऊतांचा सरकारवर निशाणा
Sanjay Raut News : शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हासंदर्भातील वादावर सर्वोच्च न्यायालयातल्या सुनावणीवर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हासंदर्भातील वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले की, निवडणूक आयोगाने बेकायदेशीररित्या धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला दिले. आयोगाने पक्षाच्या मूळ आधाराऐवजी विधिमंडळातील बहुमताचा आधार घेतला. पण लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिंदे गटातील अनेक आमदार आणि खासदार पराभूत झाले. ज्या विधिमंडळाच्या बहुमताच्या आधारावर त्यांना चिन्ह आणि पक्ष देण्यात आला, त्या आधारातील बहुतांश सदस्य पराभूत झाले आहेत. त्यामुळे हा आधारच आता शिल्लक नाही. शिंदे गटाचा धनुष्यबाण चिन्हावर कोणताही हक्क नाही. आम्ही न्यायालयात या चिन्हाला गोठवण्याची मागणी केली असल्याचं देखील राऊतांनी यावेळी सांगितलं आहे.
पुढे बोलताना राऊतांनी ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांच्या राष्ट्रपती नामनिर्देशित राज्यसभा खासदारपदी नियुक्तीवरही उपरोधिक टीका केली. निकम यांच्या अनुभवाचा फायदा भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना होईल, पण देश आणि समाजाला किती लाभ होईल, हे मला माहीत नाही. त्यांनी आता भाजपचा टीळा लावला आहे आणि ते भाजपचे सदस्य आहेत. लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्याने त्यांना राज्यसभेत पाठवले गेले. आता त्यांनी अधिकृतपणे भाजपचा प्रचार करावा, याची आम्ही वाट पाहत आहोत, असं राऊत म्हणाले.
