Sanjay Raut Press: भ्रष्टाचार वाढला आहे, अण्णा हजारेंना उठवायची गरज; संजय राऊतांची टीका

Sanjay Raut Press: भ्रष्टाचार वाढला आहे, अण्णा हजारेंना उठवायची गरज; संजय राऊतांची टीका

| Updated on: Jul 15, 2025 | 12:43 PM

खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकारवर टीका करत निशाणा साधला आहे.

शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या उबाठा-मनसे युतीच्या चर्चेवरील वक्तव्याला पाठिंबा दर्शवला आहे. ते म्हणाले,  राज ठाकरे यांचे वक्तव्य योग्य आहे, त्यात काही चूक नाही. अनौपचारिकपणे ते बोलले असले, तरी लवकरच आम्ही औपचारिकपणे यावर बोलू. आम्ही आणि आमचे कार्यकर्ते याबाबत आशावादी आहोत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र बसून याबाबत निर्णय घेतील.

पुढे बोलताना राऊत यांनी शिंदे गट आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, “शिंदे गटाचे मेळावे होतात, पण भ्रष्ट मंत्र्यांना घरी पाठवले पाहिजे. सामान्य माणसांवर आणि अधिकाऱ्यांवर कारवाई होते, पण भ्रष्ट मंत्र्यांवर का कारवाई होत नाही? नैतिकता शिल्लक असेल, तर जे पैसे घेऊन बसले आहेत, त्यांच्यावर कठोर कारवाई आणि चौकशी झाली पाहिजे. ज्यांनी गरीब कर्मचाऱ्यांवर हल्ला केला, त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला हवेत. जर एखाद्या चालकाच्या नावावर 150 कोटींची संपत्ती असेल, तर शिंदे भुमरे यांना सांगतील, ‘मला तुमच्याकडे चालक म्हणून घ्या, असा टोला राऊत यांनी लगावला.

राऊत यांनी पुढे फडणवीस यांच्यावर निशाणा साधताना सांगितले, मी मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहिले आहे, पण मला त्यांच्याकडून काही अपेक्षा नाही. ते संजय शिरसाट, संदीपान भुमरे आणि संजय गायकवाड यांच्याविरुद्ध काहीच करत नाहीत. ते हतबल मुख्यमंत्री आहेत, असा मुख्यमंत्री मी कधी पाहिला नाही. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग फक्त भ्रष्टाचाऱ्यांचे पैसे मोजण्यासाठी आहे का? गृहखाते फडणवीस यांच्याकडे आहे, पण ते हतबल असल्याने काय अपेक्षा ठेवणार? विरोधी आमदार फोडण्यासाठी पोलिसांचा वापर होतो, याशिवाय पोलिसांना दुसरे काम उरलेले नाही.

Published on: Jul 15, 2025 12:43 PM