Walmik Karad : वाल्मीक कराडने न्यायालयात दाखल केला आपण निर्दोष असल्याचा अर्ज
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आज झालेल्या सुनावणी दरम्यान आरोपी वाल्मिक कराडने न्यायालयात निर्दोष मुक्ततेचा अर्ज दाखल केला आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडने न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. यामध्ये मी निर्दोष असून, संतोष देशमुख यांच्या खुनाशी आणि खंडणीशी माझा काहीही संबंध नसल्याचा दावा त्याने केला आहे. त्यामुळे मला निर्दोष सोडा, अशी मागणी देखील त्याने न्यायालयाला केली असल्याची माहिती सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिली आहे. आज संतोष देशमुख हत्या प्रकरणावर बीड जिल्हा न्यायालयात सुनावणी पार पडली. या सुनावणीनंतर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी पत्रकार परिषद घेऊन सुनावणीदरम्यान झालेल्या युक्तिवादाची माहिती दिली.
यावेळी उज्ज्वल निकम म्हणाले की, बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज झालेल्या सुनावणीत मुख्य आरोपी वाल्मीक कराड याने न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. यामध्ये मी निर्दोष असून मला सोडा अशी केविलवाणी मागणी त्याने न्यायालयात केली आहे. याबरोबरच आरोपींनी काही कागदपत्र देखील न्यायालयाला मागितली होती. त्यानुसार आज सरकारी पक्षाच्या वतीने ती कागदपत्र न्यायालयात दाखल करण्यात आली आहेत, असं विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी म्हंटलं आहे.
