AB Form Controversy : महापालिका निवडणुकीत AB फॉर्मवरून शिंदे गटाच्या शिवसेनेत राडा; मुंबई, पुणे, अमरावतीत इच्छुक उमेदवारांचा संताप
महापालिका निवडणुकीसाठी एबी फॉर्म न मिळाल्याने शिंदे गटाच्या शिवसेनेत मोठा राडा झाला. पुणे, अमरावती आणि मुंबईत इच्छुक उमेदवारांनी संताप व्यक्त केला. पुण्यात संगीता कदम यांनी फॉर्म न मिळाल्यास टोकाचे पाऊल उचलण्याची भाषा केली, तर मुंबईच्या मागाठाण्यात भाजपला उमेदवारी दिल्याने शिवसैनिकांनी ठिय्या आंदोलन केले.
महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने, एबी फॉर्म न मिळाल्याने शिंदे गटाच्या शिवसेनेत मुंबई, अमरावती आणि पुण्यात मोठा राडा पाहायला मिळाला. अनेक इच्छुक उमेदवारांनी संताप व्यक्त करत आंदोलन केले. पुण्यात प्रभाग क्रमांक तीनमधून इच्छुक असलेल्या संगीता कदम यांना एबी फॉर्म मिळाला नाही. त्यांनी फॉर्म न मिळाल्यास गंभीर परिणाम होतील अशी भाषा वापरली. माझा फॉर्म चोरला गेल्याचा आरोप त्यांनी केला.
अमरावतीतही उमेदवारी अर्ज न मिळाल्याने शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. शिवसेना कार्यालयात अनेक इच्छुकांना एबी फॉर्मपासून वंचित ठेवल्याने कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली. मुंबईतील मागाठाण्यात वॉर्ड क्रमांक तीनमधून भाजपने प्रकाश दरेकरांना उमेदवारी दिल्याने शिवसैनिकांनी जमिनीवर बसून ठिय्या आंदोलन केले. शिवसेनेचे इच्छुक प्रकाश पुजारी होते, मात्र ऐनवेळी वॉर्ड भाजपच्या वाट्याला गेल्याने शिवसैनिक नाराज झाले. “नेत्यांच्या नातेवाईकांना संधी मिळते,” असा आरोप संतप्त शिवसैनिकांनी केला.