‘शिवसेना अन् ठाकरेंचा काडीचाही संबंध नाही, एक दिवस असा असेल मातोश्रीत फक्त…’, रामदास कदमांचं खळबळजनक भाकीत

‘शिवसेना अन् ठाकरेंचा काडीचाही संबंध नाही, एक दिवस असा असेल मातोश्रीत फक्त…’, रामदास कदमांचं खळबळजनक भाकीत

| Updated on: Feb 16, 2025 | 3:38 PM

काल रत्नागिरीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आभार सभा घेतली. त्याविषयी बोलताना एकनाथ शिंदे यांची सेना हीच बाळासाहेबांची शिवसेना असल्याचे रामदास कदम यांनी म्हटलं.

‘संजय राऊत काहीही बोलू शकतात. बाडगा अधिक कडवा असतो, असं बाळासाहेब ठाकरे बोलायचे. पण आता बाडगेपणा कोणी केला हे संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना विचारावं’, असं म्हणत संजय राऊतांनी केलेल्या टीकेवर रामदास कदमांनी पलटवार केलाय. काँग्रेससोबत जाऊन बाडगेपणा कुणी केला, हे संजय राऊतांनी ठाकरेंना विचारावे, अशी खोचक टीका करत त्यांनी पलटवार केला. काल रत्नागिरीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आभार सभा घेतली. एकनाथ शिंदे यांची शिवसेना हीच बाळासाहेबांची शिवसेना असल्याचे रामदास कदम यांनी सांगितले. बाळासाहेबांच्या विचारांचे पाईक एकनाथ शिंदे हेच आहेत. उद्धव ठाकरे यांचा काडीचा ही संबंध कोकणाशी नाही, तर शिल्लक असलेल्या ठाकरे गटातील अनेक नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी हे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत आलेत, असं म्हणत असताना ते पुढे म्हणाले, आता मातोश्रीमध्ये एक दिवस आसा येईल की उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंब हेच राहतील. याच्या पलिकडे त्यांच्या पाठीशी कोणीच उभं राहणार नाही, असं भाकीतही रामदास कदम यांनी केलं. उद्धव ठाकरेंनी जे पाप केले आहे. त्यांनी खंजीर खुपसला आहे. ठाकरे यांनी काँग्रेससोबत जाऊन बाळासाहेबांच्या विचारांशी व्याभिचार केला आहे. त्या पापाची फळ उद्धव ठाकरे यांना भोगावीच लागतील, असा हल्लाबोलही रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर केला.

Published on: Feb 16, 2025 03:38 PM