Shivsena : शिवसेना अन् धनुष्यबाणावर फैसला नाहीच…पक्षचिन्हाचा तिढा कायम, पुढील सुनावणी 12 नोव्हेंबरला
शिवसेना पक्षचिन्हावरील सुनावणी आता 12 नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका लक्षात घेता, कपिल सिब्बल यांनी तातडीने सुनावणीची मागणी केली होती. सुनावणी लांबल्याने या निवडणुकांवर संभाव्य परिणाम होण्याची शक्यता आहे.
शिवसेना पक्ष आणि त्याच्या धनुष्यबाण या पक्षचिन्हावर गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेली कायदेशीर लढाई सुरू होती. ही लढाई आता निर्णायक टप्प्यावर पोहोचली असताच ही सुनावणी पुढे ढकलण्यात आल्याची मोठी माहिती समोर आली आहे. शिवसेना पक्षाचे चिन्ह आणि त्यावरील वादग्रस्त प्रकरणाची पुढील सुनावणी आता 12 नोव्हेंबर रोजी होणार आहे. यापूर्वी, जानेवारीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नियोजित असल्याने, ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी हे प्रकरण लवकर ऐकण्याची विनंती केली होती. युक्तिवादासाठी किमान 45 मिनिटांचा वेळ आवश्यक असल्याचेही कपिल सिब्बल यांनी नमूद केले होते.
या प्रकरणाची सुनावणी एक महिन्याने पुढे ढकलण्यात आली आहे. 12 नोव्हेंबरपर्यंत सुनावणी पुढे गेल्याने, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अधिक जवळ येतील, ज्यामुळे या निकालाच्या वेळेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट यांच्यातील शिवसेनेच्या चिन्हावरून सुरू असलेल्या या कायदेशीर लढाईत, सुनावणीतील हा विलंब महाराष्ट्राच्या राजकारणावर, विशेषतः आगामी मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुका 2025 वर कसा परिणाम करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
