Anil Parab : अनिल परब यांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, ‘त्या’ अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?

Anil Parab : अनिल परब यांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, ‘त्या’ अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?

| Updated on: Dec 13, 2025 | 5:42 PM

अनिल परब यांनी विधानसभेत दोन पेनड्राईव्ह सादर करत तीन गंभीर प्रकरणांकडे लक्ष वेधले. परिवहन विभागातील अतिरिक्त आयुक्तांच्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करताना त्यांनी बनावट परवाने, पदोन्नतीसाठी लाच आणि मनी लॉन्ड्रिंगचे आरोप केले.

नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात आमदार अनिल परब यांनी सभागृहात दोन पेनड्राईव्ह सादर करत महाराष्ट्र प्रशासनातील गंभीर भ्रष्टाचाराचे आणि गैरव्यवहाराचे तीन मोठे मुद्दे उपस्थित केले. त्यांनी शासनावर निष्क्रियतेचा आरोप करत, या प्रकरणांवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली. पहिला मुद्दा मुंबईतील खारफुटी असलेल्या ३५० एकर जमिनीच्या अतिक्रमणाचा होता. परब यांनी दावा केला की, मुंबईतील पहाडी गोरेगाव परिसरात ३५० एकर जमिनीवर, जी नो डेव्हलपमेंट झोन (ND झोन) आणि महसूल विभागाच्या मालकीची आहे, भराव टाकून खारफुटी तोडण्याचे काम सुरू आहे.

मागील अधिवेशनातही त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता आणि संबंधित मंत्र्यांनी जागेला भेट देऊन कारवाईचे आश्वासन दिले होते. मात्र, मंत्र्यांच्या भेटीनंतरही अतिक्रमणाचे काम अधिक वेगाने सुरू झाले. नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीला दिलेली ७० एकर जमीन आणि खासगी मधु डेव्हलपरने एनडी झोनमधून बाहेर काढलेली ७० एकर जमीन, अशा एकूण १४० एकर जमिनीवरही काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. खाजगी बाऊन्सरच्या मदतीने माती टाकली जात असून, कार्यकर्त्यांनी विरोध केल्यास पोलिसांकडून गुन्हे दाखल केले जात आहेत. खारफुटी तोडणाऱ्यांवर कारवाई न झाल्याने शासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे, असे परब यांनी नमूद केले.

Published on: Dec 13, 2025 05:42 PM