नीलम गोऱ्हेंना सुषमा अंधारेंची थेट कायदेशीर नोटीस, उद्धव ठाकरेंबद्दलचं ‘ते’ भाष्य करणं भोवलं
ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी नीलम गोऱ्हेंच्या विधानावर भाष्य करताना त्यांच्यावर काल चांगलीच आगपाखड केली होती. सुषमा अंधारे यांनी नीलम गोऱ्हे यांना आव्हान देत उद्धव ठाकरेंवर केलेला आरोप कोर्टात सिद्ध करा, नाहीतर नाक घासून माफी मागा, असं म्हटलंय होतं.
शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी कायदेशीर नोटीस बजावली आहे. त्यामुळे नीलम गोऱ्हे यांचा पाय आता आणखी खोलात जाणार असल्याची शक्यता आहे. सुषमा अंधारे यांच्याकडून नीलम गोऱ्हे यांना अब्रू नुकसानीची नोटीस बजावण्यात आली आहे. वकील असीम सरोदे यांच्या माध्यमातून सुषमा अंधारे यांनी नीलम गोऱ्हे यांना ही कायदेशीर नोटीस बजावली आहे. नीलम गोऱ्हे यांनी साहित्य संमेलनात केलेल्या वक्तव्यासंदर्भात ही नोटीस देण्यात आली आहे. काल सुषमा अंधारे यांनी नीलम गोऱ्हेंच्या विधानावर भाष्य करताना माध्यमांसमोर त्यांच्यावर चांगलीच आगपाखड केली. सुषमा अंधारे यांनी नीलम गोऱ्हे यांना आव्हान देत उद्धव ठाकरेंवर केलेला आरोप कोर्टात सिद्ध करा, नाहीतर नाक घासून माफी मागा, असं थेट आव्हानच दिलं होतं. नीलम गोऱ्हे यांनी नुकत्याच दिल्लीतील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील एका चर्चासत्रात उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप करताना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं, असं खळबळजनक वक्तव्य केलं होतं. या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर नीलम गोऱ्हेंना सुषमा अंधारे यांनी ही कायदेशीर नोटीस पाठवली आहे.
