Uddhav Thackeray : मुहँ में राम बगल में अदानी… भाजपच्या हिंदुत्वाचा ठाकरेंनी फाडला बुरखा, तपोवनातील वृक्षतोडीवरून निशाणा
नाशिकमधील तपोवन येथील वृक्षतोडीवरून उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. यासह उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या हिंदुत्व आणि राष्ट्रप्रेमावर देखील हल्लाबोल चढवला आहे.
नाशिकमधील तपोवन येथील वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून सध्या सरकारवर चांगलाच निशाणा साधला जातोय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी साधूंच्या नावाखाली उद्योगपतींना फायदा पोहोचवण्यासाठी झाडे तोडली जात असल्याचा गंभीर आरोप करत जोरदार टीका केली तर दुसरीकडे भाजपचे हिंदुत्व थोतांड असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींच्या अयोध्या दौऱ्याचा संदर्भ दिला. त्यांनी “तिकडे जाऊन राम-राम करायचं आणि नाशिकमध्ये मोह में राम आणि बगल में अदानी असं यांचं काम आहे की काय?” असा उपरोधिक सवाल केला.
कुंभमेळ्याचे कारण पुढे करून जागा कंत्राटदारांच्या घशात घालण्यासाठी झाडे तोडली जात असल्याचा जनतेचा आरोप असून, आपण त्याच्याशी सहमत असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या भूमीवर साधुग्रामसाठी झाडे तोडली जात आहेत, मात्र हे केवळ कंत्राटदारांसाठी होत असून, त्याला आक्षेप घेऊ नये म्हणून कुंभमेळ्याचे कारण दिले जात आहे, असेही उद्धव ठाकरे यांनी नमूद केले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही नेत्यांनी वृक्षतोडीच्या या मुद्द्यावर सरकारवर समान भूमिका घेत टीका केल्याचे दिसून येते.