उद्धव ठाकरे अन् शरद पवार यांचं ‘त्या’ दीड तासांत नेमकं काय ठरलं? काय झाली सिल्व्हर ओकवर चर्चा?

| Updated on: Jan 21, 2025 | 10:08 AM

उद्धव ठाकरेंनी शरद पवार यांची भेट घेतली. जवळपास दीड तास दोघांमध्ये चर्चा झाली आणि या बैठकीत काय ठरलं? अचानक कोणती चर्चा झाली?

उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमध्ये जवळपास दीड तास चर्चा झाली. ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस नेत्यांमध्ये विधानसभेत जागावाटप आणि समन्वयांवरून ज्या टीकाटिप्पणी झाल्या त्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर आले. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात मविआच्या पुढील वाटचालीवर चर्चा झाल्याची माहिती आहे. विधीमंडळात मविआ कशापद्धतीने एकत्र काम करणार यावर चर्चा झाली आहे. विरोधी पक्षनेत्यावर तिन्ही पक्ष एकत्र दावा करणार, त्यासाठी चेहरा ठरवला जाणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका कशा लढायच्या यावरही चर्चा झाल्याची माहिती आहे. तर तिन्ही पक्षांशी चर्चा करून संयुक्त बैठक घेण्यासंदर्भातही चर्चा झाली. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट झाली आणि तात्काळ महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठकही ठरली. उद्या संध्याकाळी मविआची बैठक असल्याचे मविआतील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणालेत. तर आठवडाभरापूर्वीत मविआत संजय राऊत यांनी समन्वय नसल्याचे सांगत ठाकरेंची शिवसेना महापालिका निवडणुकीत स्वतंत्र लढणार असल्याचे सांगितले होतं. मात्र आता मविआत सर्व ठणठणीत असून संवाद सुरू असल्याचे राऊतांनी सांगितले. बघा नेमकं काय चाललंय महाविकास आघाडीत? 

Published on: Jan 20, 2025 11:16 PM