Uddhav Thackeray : ॲनाकोंडाला कोंडावंच लागेल, सत्याच्या मोर्चादरम्यान उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

Uddhav Thackeray : ॲनाकोंडाला कोंडावंच लागेल, सत्याच्या मोर्चादरम्यान उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

| Updated on: Nov 01, 2025 | 3:50 PM

मुंबईत महाविकास आघाडी आणि मनसेच्या सत्याचा मोर्चात उद्धव ठाकरेंनी मतचोरी आणि मतदार यादीतील गैरव्यवहारांवरून तीव्र हल्लाबोल केला. "ॲनाकोंडाला कोंडावंच लागेल," असे म्हणत त्यांनी जोरदार टीका केली. पक्ष, चिन्ह चोरल्यानंतर आता मतं चोरली जात असल्याचा आरोप करत, सर्व मतदारांना आपापल्या मतदार यादीतील नावांची पडताळणी करण्याचे आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं.

मुंबईतील महाविकास आघाडी आणि मनसेच्या सत्याचा मोर्चादरम्यान, उद्धव ठाकरे यांनी मतदार यादीतील कथित गैरव्यवहार आणि मतचोरीच्या मुद्द्यांवरून जोरदार हल्लाबोल केला. ॲनाकोंडाला आता कोंडावंच लागेल असा सूचक इशारा देत, त्यांनी लोकशाहीच्या रक्षणासाठी सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येण्याचे आवाहन केले. उद्धव ठाकरे यांनी या एकजुटीला केवळ विरोधी पक्षांची नव्हे, तर लोकशाहीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पक्षांची एकजुट म्हटले.

आपला पक्ष, निशाणी आणि नाव चोरलं,वडील चोरण्याचा आरोप केला हे पुरेसं नाही म्हणून आता मतं चोरण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला. मतचोरीचे अनेक पुरावे समोर येत असतानाही राज्यकर्ते आणि निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मुख्यमंत्र्यांनी लोकसभेच्या वेळी विरोधी पक्षांचा पर्दाफाश करण्याच्या केलेल्या विधानाचा उल्लेख करत, ठाकरेंनी त्यांना आव्हान दिले. यातून मुख्यमंत्र्यांनी अप्रत्यक्षपणे मतचोरी झाल्याचे मान्य केले असल्याचा दावा त्यांनी केला. महाराष्ट्राने देशाला दिशा दाखवत, सर्वसामान्य मतदारांनी आपल्या यादीतील नावे आणि घरात नसलेल्या मतदारांची तपासणी करण्याचे आवाहनही उद्धव ठाकरेंनी केले.

Published on: Nov 01, 2025 03:50 PM