Dhule | अवकाळी पावसाचा थयथयाट… वारा एवढा सुटला की पपईची गाडीच उलटली; पावसाच्या तांडवाने धुळेकर हादरले
धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात अवकाळी पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. अचानक आलेल्या जोरदार वादळी वाऱ्यासह गारपीट आणि मुसळधार पावसामुळे परिसरात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. काही मिनिटांतच हवामानात झालेल्या या बदलामुळे शेतकऱ्यांची शेती उद्ध्वस्त झाली असून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.
धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात अवकाळी पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. अचानक आलेल्या जोरदार वादळी वाऱ्यासह गारपीट आणि मुसळधार पावसामुळे परिसरात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. काही मिनिटांतच हवामानात झालेल्या या बदलामुळे शेतकऱ्यांची शेती उद्ध्वस्त झाली असून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की, त्या वेळी कोणी व्यक्ती मोकळ्या जागेत असती तर जिवितहानी झाली असती, अशी भीती स्थानिक नागरिक व्यक्त केली. या अवकाळी पावसादरम्यान शिरपूर तालुक्यात भरलेली पपईची गाडी सोसाट्याच्या वाऱ्यामुळे उलटून पडल्याची घटना घडली असून या अपघातात काही नागरिक जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली. अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका शेती व्यवसायाला बसला असून, केळी, पपई, हरभरा तसेच गहू या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. उभ्या पिकांना जोरदार वाऱ्यामुळे जमीनदोस्त व्हावे लागले असून अनेक शेतकऱ्यांचे महिन्यांचे कष्ट काही क्षणांतच वाया गेले आहेत. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला गेला आहे. शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. दरम्यान, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी शासनाकडे तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने त्वरित दखल घेऊन सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना योग्य ती मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी बांधवांकडून करण्यात येत आहे.
