Vaishnavi Hagawane : त्यांनी वैष्णवीचा खून केला आहे, बाकी सगळा बनाव आहे; अनिल कसपटेंचा दावा
Anil Kaspate On Vaishnavi Death : हुंडाबळी प्रकरणातील मृत वैष्णवी हगवणेच्या शवविच्छेदन अहवालातून समोर आलेल्या धक्कादायक माहितीनंतर अनिल कसपटे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
वैष्णवीचा शवविच्छेदन अहवाल समोर आलेला असून त्यात तिला मृत्यूच्या पूर्वी 24 तासांच्या आत मारहाण झालेल्या जखमा देखील आहेत. त्यामुळे माझ्या मुलीने आत्महत्या केलेली नसून तिची हत्या करण्यात आलेली आहे, असं वैष्णवीचे वडील अनिल कसपटे यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना बोलताना म्हंटलं आहे. पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. काल वैष्णवीचा शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे. त्यातून तिच्या अंगावर मारहाण केलेल्या एकूण 29 जखमा असून त्यातील 15 जखमा या मृत्यूच्या 24 तासांच्या आतल्या आहेत. त्यामुळे वैष्णवीच्या मृत्यूपूर्वी तिला जबर मारहाण करण्यात आलेली होती हे यावरून स्पष्ट होत आहे.
यावेळी बोलताना कसपटे म्हणाले की, मृत्यूपूर्वी माझ्या मुलीला मारहाण करण्यात आलेली होती आणि त्याचवेळी तिचा मृत्यू झाला आहे. आत्महत्या हा बनाव आहे. ही हत्या आहे. काही जुन्या जखमा देखील शरीरावर आढळून आल्याचं अहवालात म्हंटलं आहे. म्हणजे तिला सातत्याने मारहाण होत होती. तिचा छळ केला जात होता. या प्रकरणात चांगला वकील नियुक्त करण्यात यावा. आम्हाला या प्रकरणातील माहिती कळवण्यात यावी, तपास एसआयटीकडे देण्यात यावा, अशी मागणी देखील यावेळी वैष्णवीच्या वडिलांनी केलेली आहे.
