700 रुपयांची उधारी परत दे म्हणताच तो अंगावर आला अन् भावाला वाचवताना… CCTV मध्ये बघा काय घडलं?

| Updated on: Oct 26, 2025 | 1:52 PM

कल्याणजवळील बल्याणी येथे ७०० रुपयांच्या उधारीवरून दुकानदारावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला झाला. हल्ल्यात दुकानदार आणि त्याचा भाऊ गंभीर जखमी झाले. टिटवाळा पोलिसांनी गुन्हेगारांवर कठोर कारवाई न केल्याने स्थानिकांमध्ये तीव्र संताप आहे.

कल्याणजवळील बल्याणी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर घटना समोर आली आहे. किराणा मालाच्या दुकानात केवळ उधारी मागितल्याच्या क्षुल्लक कारणावरून एका दुकानदारावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात दुकानदारासह त्याचा बचाव करण्यासाठी गेलेला त्याचा भाऊही गंभीर जखमी झाला आहे. विशेष म्हणजे या घटनेनंतर टिटवाळा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात पोलीस गांभीर्य दाखवत नसल्याचा गंभीर आरोप पीडित कुटुंबाने केला आहे. ज्यामुळे परिसरातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

नेमकं काय घडलं?

बल्याणी परिसरात सध्या नशेखोरांचा उपद्रव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. याच भागात श्रीकांत यादव यांचे किराणा मालाचे दुकान आहे. बुधवारी २३ ऑक्टोबर रोजी दुपारी हसन शेख नावाचा तरुण त्याचा साथीदार शाने अली याच्यासोबत श्रीकांत यादव यांच्या दुकानात आला. हसन शेख याने काही वस्तूंची मागणी केली. मात्र, यापूर्वीची 700 रुपये उधारी थकीत असल्याने दुकानदार श्रीकांत यादव यांनी हसनला आधी ती उधारी चुकती करण्यास सांगितले.

उधारी मागताच हसन शेख कमालीचा संतप्त झाला आणि त्याने कोणताही विचार न करता कमरेतून धारदार चाकू बाहेर काढला आणि दुकानदार श्रीकांत यादव यांच्यावर हल्ला केला. हा थरार दुकानातील सीसीटीव्हीत कैद झाला आहे. गोंधळ ऐकून श्रीकांत यादव यांचे भाऊ रमाकांत यादव भांडण सोडवण्यासाठी आणि भावाला वाचवण्यासाठी पुढे आले असता, हल्लेखोर हसन शेखने त्यांच्यावरही हल्ला चढवला आणि प्राणघातक वार केले.

दुकानात एकच गोंधळ

या जीवघेण्या हल्ल्यामुळे दुकानात एकच गोंधळ उडाला. मात्र, आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली आणि मोठे धाडस दाखवत हल्लेखोर हसन शेखच्या तावडीतून धारदार शस्त्र हिसकावून घेतले. स्थानिकांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे श्रीकांत यादव आणि रमाकांत यादव यांचा जीव थोडक्यात वाचला. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले आहेत.

घटनेनंतर जखमी दुकानदाराने टिटवाळा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मात्र, पोलीस या प्रकरणात कोणतीही कठोर कारवाई करत नसल्याने श्रीकांत यादव यांच्या कुटुंबाने आणि स्थानिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. पोलिसांच्या निष्क्रियतेमुळेच परिसरात नशेखोरांचा उपद्रव वाढला असून त्यांच्यावर त्वरित कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. या घटनेमुळे बल्याणी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Published on: Oct 26, 2025 01:51 PM