LIVE : श्रीनगरवरून अमरावती जिल्ह्यातील 32 पर्यटक दिल्लीच्या दिशेने रवाना
Kashmir Pahalgam Terror Attack LIVE News and Updates in Marathi : पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने मोठे निर्णय घेतले आहे. सिंधू जल कराराला स्थगिती देण्यात आली आहे. अटारी बॉर्डरही बंद करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील 6 जण या हल्ल्यात मृत्यूमुखी पडले.

Kashmir Pahalgam Terror Attack LIVE News and Updates in Marathi : पहलगाम दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील 6 जणांनी जीव गमावला असून त्यात पुण्यातील दोघांचा समावेश आहे. संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचे पार्थिव आज पहाटे पुण्यात आणण्यात आलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी जगदाळेंच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं, जगदाळे कुटुंबाचं सांत्वन केलं.पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीच्या तीन नागरिकांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण शहर शोकमग्न झालं आहे. या हल्ल्याच्या तीव्र निषेधार्थ आज डोंबिवली बंद पाळण्यात येत असून, सर्व पक्ष, व्यापारी, शाळा, आणि नागरिक यामध्ये सहभागी होणार आहेत. काल हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले तिघा पर्यटकांवर डोंबिवलीत अंत्यसंस्कार करण्यात आले. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने कठोर पावलं उचलली असून पाकिस्तानची कोंडी करण्यासाठी मोठे निर्णय घेण्यात आले आहे. सिंधू जल कराराला स्थगिती देण्यात आली आहे. भारताकडून अटारी बॉर्डरही बंद करण्यात आली आहे. पाकिस्तानात गेलेल्या भारतीयांना 1 मे पर्यंत परत येण्याचे आवाहन सरकारने केलं आहे.
LIVE NEWS & UPDATES
-
आमच्या समोर आमच्या नातेवाईकांवर हल्ला- अनिष्का मोने
अतिरेकी बोलत होते, हिंदू कोण? त्यानंतर गोळीबार सुरु केला. आमच्या समोर आमच्या नातेवाईकांवर हल्ला झाला. आम्ही काहीच करु शकलो नाही, असे अनिष्का मोने यांनी सांगितले.
-
मंत्री गिरीश महाजन यांनी घेतली पर्यटकांची भेट
जळगावच्या जामनेर तालुक्यातून जम्मू काश्मीर येथे गेलेल्या भाविकांची मंत्री गिरीश महाजन यांनी भेट घेतली. जामनेर तालुक्यातील शेवगा पिंपरी सह विविध गावातील तब्बल 29 भाविक ग्रामस्थ हे वैष्णोदेवी अंबरनाथ या ठिकाणच्या दर्शनासाठी गेले आहेत. पहलगामध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर सर्व भाविक जम्मू-काश्मीरमध्ये अडकले आहे. या सर्व भाविकांना सुखरूपपणे आपापल्या गावी पोहोचवण्यात येईल, असा आश्वासन मंत्री गिरीश महाजन यांनी दिला आहे.
-
-
पृथ्वीराज चव्हाण यांचा पर्यटकांशी संवाद
सातारा जिल्ह्यातील सात पर्यटक जम्मू येथे अडकले आहे. त्यांना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी फोनवरून संवाद साधत धीर दिला. तसेच मृत्युमुखी पडलेले संतोष जगदाळे हे मूळचे सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील असून त्यांच्या निवासस्थानी कुटुंबीयाच्या भेटीसाठी गेले आहेत.
-
बुलढाणा जिल्ह्यातील पर्यटकांना आणण्यासाठी प्रयत्न
जम्मू काश्मीरातील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये अडकून पडलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील पर्यटकांना आणण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहे. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी जम्मू-काश्मीरमध्ये जाऊन त्या पर्यटकांची भेट घेतली. तुम्हाला घरी सुखरुप पोहचविण्यासाठी रेल्वे गाडीची व्यवस्था करण्यात आली असल्याचे त्यांनी पर्यटकाना सांगितले.
-
किशोरी पेडणेकर यांच्याकडून देसले कुटुंबियांचे सांत्वन
जम्मू काश्मीरमधील पहलगाम याठिकाणी झालेल्या अतिरेकी हल्ल्यात पनवेलमधील दिलीप देसले यांच्या कुटुंबियांना सांत्वन करण्यासाठी ठाकरे गटाचे माजी महापौर किशोरी पेडणेकर, शिवसेना खासदार श्रीरंग बारणे आणि माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी घेतली भेट. यावेळी त्यांनी या हल्ल्याच्या निषेध केला.
-
-
अमरावतीचे पर्यटक दिल्लीसाठी रवाना
जम्मू काश्मिरातील पहलगाम दहशतवादी हल्ला प्रकरण देशभरात संतापाची लाट आहे. अशातच पहलगाम आणि काश्मीर येथे अमरावती जिल्ह्यातील 70 पेक्षा अधिक पर्यटक अडकून पडले होते. मात्र हे सर्व पर्यटक सुखरूप आहे. त्यापैकी 32 पर्यटक राष्ट्रीय महामार्गाने दिल्लीच्या दिशेने निघाले आहे.
-
“जीव वाचवण्यासाठी टिकल्या काढून फेकल्या”, शरद पवारांना कौस्तुभ गणबोटेंच्या पत्नीने सांगितला सर्व थरार
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत पावलेल्या पुण्यातील जगदाळे यांचे पार्थीव घरी आणण्यात आलं आहे. यावेळी शरद पवार यांनी गणबोटे यांच्या कुटुंबियांचीही भेट घेतली. यावेळी त्यांच्या पत्नीनं त्यावेळी जो काही थरार घेतला त्याबद्दलची सर्व हकीकत सांगितली. त्या म्हणाल्या की “जीव वाचवण्यासाठी आम्ही आमच्या टिकल्या काढून फेकल्या, अजान आती है क्या असं विचारल्यानंतर आम्ही मोठमोठ्याने अजान म्हणू लागलो, अल्ला अल्ला करायला लावलं’ असंही गणबोटे यांच्या पत्नीनं सांगितलं.
-
पहलगाम हल्ल्यानंतर नरेंद्र मोदी यांची मधुबनीमधून पहिलीच जाहीर सभा
मधुबनीमधून पंतप्रधानांनी नागरिकांना संबोधित केलं. तेव्हा त्यांनी सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहलगाम हल्ल्यातील मृत पर्यटकांना श्रद्धांजली वाहिली. मोदींनी नागरिकांशी संवाद साधताना म्हटलं आहे की, “देशातील बिहारच्या विकासाशी संबंधित हजारो करोडो रुपयांच्या प्रकल्पाचं शिलान्यास आणि लोकार्पण झालं आहे. वीज, रेल्वे आणि इन्फ्रास्ट्रकरच्या विविध कामामुळे रोजगाराच्या संधी निर्माण होतील. जोपर्यंत देशातील गावं मजबूत होणार नाही, तोपर्यंत भाजपचा वेगानं विकास होणार नाही. पंचायती राज्याच्या कल्पनेमागे हीच भावना आहे. मागच्या दशकात पंचायतींना सशक्त करण्यासाठी एकामागोमाग एक पावलं उचलली. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पंचायत मजबूत केली. गेल्या दशकात दोन लाखाहून अधिक पंचायतींना इंटरनेटने जोडलं आहे.” असं म्हणत पंचायत मजबूत करण्याबाबत वक्तव्य केलं आहे.
-
काश्मीरला जा घाबरू नका; मनसेचं पर्यटकांना आवाहन
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर ‘काश्मीरला जा घाबरू नका’, असं आवाहन मनसेने पर्यटकांना केलं आहे. मनसेचे संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेत पर्यटकांना हा संदेश दिला आहे. ते म्हणाले की,” काश्मीरला जाताना आता भीती नको. भारतीय सेना नागरिकांचे संरक्षण करण्यास सक्षम आहे. दहशतवादाला आम्ही पर्यटनाने उत्तर देणार आहोत” असा विश्वास देत मनसेचे पदाधिकारी देखील आता काश्मीरला जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
-
जळगावात सकल हिंदू समाजाच्या वतीने मोर्चा
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आज जळगावात सकल हिंदू समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा पोहोचल्यानंतर या ठिकाणी पाकिस्तानचा प्रतीकात्मक पुतळा जाळण्यात आला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात येऊन पाकिस्तानचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला..
-
परशुराम घाटात एक भाग कोसळला
परशुराम घाटात काम चालू असताना घाटाचा एक भाग कोसळला. यानंतर एक लाईन सुरक्षेच्या दृष्ठिकोनातून बंद करण्यात आली. सध्या चिपळूण पोलीस ट्राफिक पोलीस घटना स्थळी दाखल आहेत. वाहतूक कोंडी निर्माण झालीय.
-
मालेगावात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक
पेहेलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ मालेगावात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक. या हल्ल्याच्या विरोधात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानने केली निदर्शने. हाताला काळ्या फित बांधून केला दहशतवादी हल्ल्याच्या निषेध. आंदोलकांनी दिल्या पाकिस्तान विरोधी घोषणा. दशहतवादी संघटनेच्या प्रतिकात्मक पुतळ्याला मारले जोडे.
-
शिवसेना ठाकरे गटाचे नाशिकमध्ये आंदोलन
शिवसेना ठाकरे गटाचे नाशिकमध्ये आंदोलन. नाशिकच्या शालिमार परिसरातील कार्यालयाबाहेर आंदोलन. पाकिस्तान विरोधात घोषणाबाजी. काळे झेंडे दाखवत आंदोलन.
-
अधिकाऱ्यांनी पूर्वपरवानगीशिवाय कार्यालय सोडल्यास निलंबन
अधिकाऱ्यांनी पूर्वपरवानगीशिवाय कार्यालय सोडल्यास निलंबन करण्यात येईल असे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. मुख्यालयात अनुपस्थित राहणाऱ्या अधिकार्यांना बावनकुळेंनी इशारा दिला आहे. जनसेवेत कसूर करणाऱ्या अधिकार्यांची गय करणार नाही असे त्यानी बजावले.
-
दहिसर येथील नवविवाहित जोडपे सुखरूप घरी
पहलगाममध्ये अडकलेले दहिसर येथील नवविवाहित जोडपे सुखरूप घरी परतले. काश्मिरी मुस्लिम ड्रायव्हरने पहलगाममधून बाहेर पडण्यास मदत केली. दहिसरमधील कांदरपाडा येथील रहिवासी मनाली आणि प्रणय ठाकूर यांचे लग्न ३ मार्च रोजी झाले. लग्नानंतर, मनाली आणि प्रणय यांनी जम्मू आणि काश्मीरमध्ये त्यांचा हनिमून प्लॅन केला आणि २१ एप्रिल रोजी दोन्ही जोडपे पहलगामला पोहोचले होते.
-
जळगावमधील कांदा उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त
जिल्ह्याच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात कांद्याने पाणी आणले आहे. भावही नाही आणि अवकाळीचा फटका यावर्षी बसला त्यामुळे लावलेला खर्चही यावर्षी निघाला नाही, अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली आहे.
-
कर्जत नगरपंचायत अध्यक्षपदाची निवडणूक जाहीर
कर्जत नगर पंचायत अध्यक्ष पदाची निवडणूक जाहीर झाली आहे. 2 मे रोजी कर्जत नगर पंचायतीच्या नगराध्यक्षाची निवडणूक होणार आहे. आमदार रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली, भाजपाच्या ताब्यातून एकहाती सत्ता आणली होती.
-
चाऱ्याची शेतकऱ्यांकडून साठवणूक
धुळ्यात जनावरांना लागणाऱ्या चाऱ्याची शेतकऱ्यांकडून साठवणूक करण्यात येत आहे. पावसाळ्यापूर्वीच शेतकर्यांकडून मोठ्या प्रमाणात चारा साठवणूक करण्यात येतोय. हिरव्या आणि सुक्या चाऱ्याचे भाव गगनाला भिडले होते.
-
मालेगाव बंदची हाक
पहेलगाम येथील घटनेच्या निषेधार्थ आज मालेगाव बंदची हाक देण्यात आली आहे. विविध सामाजिक संघटनांकडून आंदोलने देखील होणार आहे. काश्मीरच्या पहेलगाम भागात झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी व या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या 26 नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आज मालेगाव बंदची हाक देण्यात आली आहे.
-
तुळजापूरमध्ये गुंडगिरीचा कळस
तुळजापूर सध्या पवनचक्की कंपनीच्या सिक्युरिटी कडून शेतकर्यांना मारहाण तसेच ड्रग्ज प्रकरणामुळे चर्चेत असतानाच, तुळजापूर येथे पोलीस स्टेशनमध्ये गुंडगिरीचा कळस गाठत, थेट पोलीस ठाण्यात घुसून एका तरुणाने पोलिसाला अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
-
मुंबईतील विलेपार्ले येथे महापालिका प्रशासनाने जैन मंदिर हटवल्याच्या निषेधार्थ आक्रोश मोर्चा
मुंबईतील विलेपार्ले येथे महापालिका प्रशासनाने जैन मंदिर हटवल्याच्या निषेधार्थ आक्रोश मोर्चा करण्यात येत आहे. सोलापुरातील जैन सामज बांधवांच्या वतीने आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. सोलापुरातील गांधी नाथा शाळा ते जिल्हाधिकारी कार्यालयापार्यंत मोर्चा असेल. जैन समाजाच्या धार्मिक स्थळावर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.
-
डोंबिवली बंदसाठी ठाकरे गट रस्त्यावर
डोंबिवली बंदसाठी ठाकरे गट रस्त्यावर उतरलं आहे. डोंबिवलीतील रिक्षासह अनेक दुकानदारांना बंदचं आवाहन करण्यात आलंय. काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सर्वपक्षीय बंद पुकारला होता. मात्र आज सकाळपासून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. तर काही ठिकाणी तुरळक रिक्षा आणि दुकाने सुरू असून ठाकरे गटाकडून ती दुकानंदेखील बंद करण्यात येत आहेत.
-
महाराष्ट्र सरकार पर्यटकांची पूर्ण काळजी घेत आहे- राऊत
“केंद्रानं विरोधी पक्षांच्या सूचनांचंही पालन करावं. महाजन काश्मिरात गेले होते, शिंदेंना जाण्याची गरज नव्हती. महाराष्ट्र सरकार पर्यटकांची पूर्ण काळजी घेत आहे. महाराष्ट्र सरकार पूर्ण क्षमतेनं काम करतंय,” असंही राऊत म्हणाले.
-
काश्मीरच्या प्रश्नावर विशेष अधिवेशन घेण्यास हरकत नाही- संजय राऊत
“काश्मीरच्या प्रश्नावर विशेष अधिवेशन घेण्यास हरकत नाही. दोन दिवसीय विशेष अधिवेशनात विरोधकांनाही बोलू दिलं पाहिजे. देशातील गंभीर प्रश्नांवर चर्चा झालीच पाहिजे. सरकार घेईल त्या निर्णयाला पाठिंबा असेल. संकट काळात आम्ही केंद्र सरकारच्या पाठिशी आहोत,” असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले.
-
ठाणे- राम रेपाळे शिवसेनेच्या राज्य सचिवपदी
ठाणे- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अत्यंत जवळचे विश्वासू म्हणून ओळख असलेले ठाण्यातील माजी स्थायी समिती सभापती राम रेपाळे यांच्यावर राज्यसचिव पदाची मोठी जबाबदारी सोपवण्यात आली. शिंदेंच्या रणनीतीनुसार ठाकरे गटाचे कार्यकर्ते पदाधिकारी आपल्या गटात आणण्यासाठी कामगिरी चोख बजावली होती.
-
पहलगाममधल्या घटनेच्या निषेधार्थ आज मालेगाव बंदची हाक
पहलगाममधल्या घटनेच्या निषेधार्थ आज मालेगाव बंदची हाक देण्यात आली आहे. विविध सामाजिक संघटनांकडून आंदोलनंदेखील होणार आहेत. काश्मीरच्या पहलगाम भागात झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आणि या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या 26 नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आज मालेगाव बंदची हाक देण्यात आली आहे.
-
लष्कर-ए-तोयबासाठी काम करणाऱ्या 4 जणांना अटक
लष्कर-ए-तोयबासाठी काम करणाऱ्या 4 जणांना अटक करण्यात आली आहे. पहलगाममधील हल्ल्यानंतर काश्मीर चांगलंच तापलं आहे. कालही घुसखोरी करणाऱ्या 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं होतं. बांदीपोरा भागातून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रही जप्त करण्यात आली आहेत.
-
पहलगाम येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्याच्या निषेधार्थ उद्या अमरावती शहर बंद
अमरावती – जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्याच्या निषेधार्थ उद्या अमरावती शहर बंद व निषेध आंदोलन.
विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व सर्वच हिंदुत्ववादी संघटनाच्या वतीने बंदच आवाहन करण्यात आलं आहे. अमरावतीच्या राजकमल चौकात हिंदुत्ववादी संघटनांच उद्या सकाळी दहा वाजता आंदोलन करण्यात येईल.
-
काश्मीरमध्ये अडकलेल्या 75 पर्यटकांची पहिली तुकडी मुंबईत दाखल
पहलगाममधील हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये अडकलेल्या 75 पर्यटकांची पहिली तुकडी मुंबईत दाखल झाली आहे. शिंदेंच्या उपस्थितीत 75 प्रवासी एअरलिफ्ट. काश्मीरमध्ये अडकलेले पर्यटक विशेष विमानाने मुंबईत दाखल होत आहेत.
-
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ डोंबिवली बंद, तिघा मृत पर्यटकांवर अंत्यसंस्कार
पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीच्या तीन नागरिकांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण शहर शोकमग्न झालं आहे. या हल्ल्याच्या तीव्र निषेधार्थ आज डोंबिवली बंद पाळण्यात येत असून, सर्व पक्ष, व्यापारी, शाळा, आणि नागरिक यामध्ये सहभागी होणार आहेत. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या 3 डोंबिवलीकरांवर शोकाकुल अंत्यसंस्कार करण्यात आले.
Published On - Apr 24,2025 8:26 AM
