Maharashtra Local Body Elections 2025 : मतदानात सावळा गोंधळ, केंद्रीय मंत्र्यांसह विरोधकही संतापले, अपडेट काय ?
महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये मतदानाला गालबोट लागले. अनेक ठिकाणी गोंधळ, ईव्हीएम बिघाड आणि गैरप्रकार दिसून आले. मुक्ताईनगरात केंद्रीय मंत्री रक्षा खडसे आणि पोलिसांमध्ये भाजप उमेदवारावरून वाद झाला. तसेच, दोन कट्टर विरोधकही आमने-सामने आले. खुलताबादमध्येही मतदानात हस्तक्षेपामुळे तणाव निर्माण झाला.
महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये आज 264 नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सुरू असून कोट्यवधी नागरिक मतदानाचा हक्क बजावणार आहेत. आत्तापर्यंत अनेक ठिकाणी मतदान सुरळीत पार पडले असले तरी काही ठिकाणी गोंधळ , राडा झाल्यामुळे मतदानाला गालबोट लागल्याचं दिसून आलं. अनेक ठिकाणी ईव्हीएम बंद पडलं, तर कुठे आणखी काही गैरप्रकार आढळल्याने राजकीय वातावरण तापलेलं होतं. याच दरम्यान जळगावच्या मुक्ताईनगरांत चक्क केंद्रीय मंत्री आणि पोलीस यांच्यात बाचाबाची झाल्याचे दिसून आले.
केंद्रीय मंत्री रक्षा खडसे आणि पोलीस यांच्यात वाद झाला. मतदान केंद्रावर असलेल्या पोलिसांवरच रक्षा खडसे या संतापल्याचे दिसून आले होते. भाजपच्या उमेदवाराला केंद्रावर पोलिसांनी अडवल्यामुळे हा संताप झाला. त्यामुळे जुन्या शहारत काही काळ गोंधळाचं वातावरण दिसून आल्या.
एकाला एक आणि दुसऱ्याला भलतंच असं नको… सर्वांना समान नियम पाहिजेत,
भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार असलेल्या व्यक्तींना पोलिसांकडून अडवण्यात आलं. ते पाहून खुद्द केंद्रीय मंत्री रक्षा खडसे या गाडीतून उतरल्या आणि त्यांनी पोलिसांशी आधी संवाद साधला, मात्र नंतर वाद पेटल्याचे दिसून आलं. तुम्हाला जमत नसेल तर सांगा, सगळ्यांना सारख वागवा, समान न्याय द्या अशी मागणी त्यांनी केली. जर तुम्ही त्यांच्या उमेदवाराला जाऊ देत नसाल तर यांना (भाजप उमेदवार) पण जाऊ देऊ नका, पण जर तुम्ही त्यांना (दुसरे उमेदवार) जाऊ देत असाल, तर यांनाही जाऊ दे. नियम सर्वांना सारखेच पाहिजे असं त्या म्हणाल्या, तुम्हाला जमत नसेल तर बाजूला सरका, दुसरा ऑफीसर इथ उभा राहू दे अशा शब्दांत रक्षा खडसे यांनी त्या पोलिसांना समजवालं. त्यांच्यातला वाद हा चर्चेचा विषय ठरला होता. त्यामुळे शहरात काही काळ गोंधळाचं वातावरण होतं.
मतदान केंद्रावर दोन कट्टर विरोधक आमने सामने
दरम्यान मुक्ताईनगरमध्ये दोन कट्टर विरोधक मतदान केंद्रावर आमने-सामने आल्याचं चित्र दिसून आलं. शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील, आणि एकनाथ खडसे मतदारांच्या भेटीगाठी घेताना आमने– सामने आले. त्यांची वाहनं समोर आली, त्यामुळे गोंधळाचं वातावरण होतं. ते मला ओव्हरटेक करून पुढे गेले, आमदारांची गुंडगिरी वाढली असा आरोप एकनाथ खडसे यांनी केला.
तर त्यावर पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं. एकनाथ खडसेंना माझी हवा सहन होत नाही, ओव्हरटेक करणं हा काय कायद्याचा भंग आहे का? असा सवाल विचारत खडसे स्वतः रस्ता अडवतात,, तेच गुंडगिरी करतात अशी टीका त्यांनी केली.
खुलताबाद मध्ये मतदान केंद्रावर उडाला मोठा गोंधळ
दरम्यान राज्यात अनेक ठिकाणी गोंधळाचं वातावरण दिसलं. खुलताबाद येथील मतदान केंद्रावर उमेदवार मतदाराला थेट मतदान करण्यासाठी मतदान केंद्रात घेऊन जात होता. यावर इतर उमेदवारांनी तीव्र आक्षेप नोंदवला. काही उमेदवारांच्या प्रतिनिधींनी निवडणूक अधिकाऱ्यांवर दुजाभाव करत असल्याची तक्रार केली. त्यामुळे मतदान केंद्राबाहेर एकच गोंधळ पाहायला मिळाला. या प्रकारामुळे मतदान केंद्रावर काही वेळ तणाव निर्माण झाला होता. मात्र पोलिसांच्या मध्यस्थीनंतर परिस्थिती नियंत्रणात आली.