मुंबई कनेक्टचा महाप्रयोग; वॉटर टॅक्सीसह लोकलला तीन अतिरिक्त डब्बे, एकाच तिकीटावर महामुंबईत कुठे ही फिरा, महायुतीचे वचन काय?
Mahayuti Manifesto: महायुतीच्या वचननाम्यात मुंबई कनेक्टचा महाप्रयोग राबविण्याचे वचन देण्यात आले आहे. लोकलपासून ते वॉटर टॅक्सीपर्यंतच्या सेवांची गोळाबेरीज मांडण्यात आली आहे. विशेष म्हणजे मुंबईसह एमएमआरडी क्षेत्रात एकाच तिकीटावर प्रवास करता येईल.

Mumbai Local to Water Taxi : महायुतीचा वचननामा आज प्रसिद्ध करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रिपाईचे प्रमुख रामदास आठवले, मुंबई भाजपाध्यक्ष अमित साटम यांच्यासह महायुतीमधील घटक पक्षातील मान्यवरांच्या हस्ते हा वचननामा प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी मुंबई कनेक्टचा महाप्रयोग समोर आला. लोकलला तीन अतिरिक्त डब्बे जोडण्यापासून ते वॉटर टॅक्सीपर्यंत दळणवळणाची सुविधा देण्यात येणार असल्याचे वचन या जाहीरनाम्यातून देण्यात आले आहे.
कचऱ्यापासून वीज निर्मिती
डंपिंग बंद करण्याकडे वाटचाल सुरू आहे. नवीन पद्धतीने झिरो गार्बेजचा प्लान करत आहोत. कचऱ्यापासून वीज निर्मितीचा प्रकल्प सुरू करणार आहोत. स्वच्छ वीज देणार आहोत. गॅस निर्मितीही करणार आहोत. वाहने चालवण्यासाठी अक्षय ऊर्जा, ग्रीन ऊर्जेवर क्लायमेट अॅक्शन प्लान हाती घेतला आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मुंबईला एक शाश्वत शहराकडे घेऊन जाण्याचा प्रयोग राबविण्यात येणार असल्याचे आश्वासन फडणवीस यांनी दिले.
लोकलचे तीन डब्बे वाढवणार
रेल्वेचे तीन डबे एक्स्ट्रा वाढवणार आहोत. एसीचे डबे करणार आहोत. सेकंड क्लासच्या तिकीटात वाढ करणार नाही. आम्ही टप्प्याटप्प्याने काम करणार आहोत. मुंबईत रो रो सुरू केली होती. ती यशस्वी सुरू आहे. काही ठिकाणी पॅसेंजर बोट सुरू केली आहे. आता एमएमआरच्या क्षेत्रात ८५ नॉटिकल माईल्स वॉटर ट्रान्सपोर्ट सुरू आहे. ती २००वर नेणार आहोत. २१ ठिकाणी जेट्टी तयार करणार आहोत. वॉटर टॅक्सी आणणार आहोत. स्वस्तात प्रवास करणार आहोत. नवी मुंबईतील एअरपोर्टपासून गेटवेपर्यंत वॉटर टॅक्साने येता येईल, असं प्लानिंग केलं आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
एकाच तिकीटावरून प्रवास
आता एका तिकीटावरून मेट्रो, मोनो, रेल्वे बसमधून जाता येतं. आता याच तिकीटावरून वॉटर टॅक्सीतून जाता येणार आहे. मुंबईसह एमएमआरडी परिसरात आता या एकाच तिकीटावर मुंबईतील सामान्यांना आणि नोकरदार वर्गाला प्रवास करता येईल. त्यामुळे त्यांचा मोठा वेळ वाचेल. इतकेच नाही तर मुंबईकरांचा मोठा वेळ हा ट्रान्सपोर्टेशनमध्ये जातो, तेव्हा आडवी-उभी मुंबई जोडण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. पुढचे ३०-४० वर्ष रस्त्यांवर कधीच खड्डे पडणार नाही, अशी योजना आखली आहे असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. मुंबईत सिमेंट रस्त्यांवर जोर देण्यात येणार आहे. मुंबईसाठी विविध यंत्रणा काम करणार आहे अशी माहिती त्यांनी दिली.
