Rain Updates : मुंबईकरांनी अनुभवला पहिला पाऊस, अनेक भागात हजेरी, वाशिम, सोलापूरलाही झोडपलं

| Updated on: May 22, 2026 | 2:06 PM

मुंबईकरांना प्रचंड उकाड्यानंतर पहिल्या पावसाने मोठा दिलासा दिला. उपनगरांमध्ये सरी बरसल्याने हवेत गारवा निर्माण झाला. सोलापूर, हिंगोली, नाशिकसह अनेक भागांतही अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे तापमानाचा पारा खाली आला असला तरी, अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची काही ठिकाणी तारांबळ उडाली.

निम्म्यापेक्षा कमी का होईना पण मुंबईकरांना आज मोठा दिलासा मिळाला आहे. आज मुंबईच्या काही भागात पावसाच्या सरी बरसल्या. गेल्या काही महिन्यांपासून मुंबईत प्रचंड उकाडा झाला आहे. मुंबईकरांच्या अंगाची लाही लाही होत आहे. त्यामुळे आज येईल की उद्या येईल… या आशेने मुंबईकर पावसाची प्रतिक्षा करत होते. अखेर मुंबईकरांची प्रतिक्षा फळाला आली. आज उपगनरातील काही भागात पावसाने चांगलीच हजेरी लावली. त्यामुळे हवेत काहीवेळ गारवा निर्माण झाला होता. अचानक आलेल्या पावसामुळे मुंबईकर चांगलेच सुखावले होते. तर दुसरीकडे हिंगोली आणि सोलापुरातही पावसाने हजेरी लावल्याने दोन्ही जिल्ह्यातील वातावरण अल्हाददायक झालं होतं.

मुंबई उपनगरातील काही भागात आज सकाळीच पावसाने चांगलीच हजेरी लावली. मुंबईत सकाळपासूनच ढगाळ वातावरण होतं. त्यामुळे उकाड्यापासून काहीवेळ दिलासा मिळाला. त्यानंतर मुलुंड, कांजूरमार्ग, भांडुप परिसरात रिमझिम पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती. तर पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्याने उकाड्यापासून दिलासा मिळाला. आज मुंबईतील अनेक भागात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

हिंगोलीला झोडपले

हिंगोलीच्या वसमत शहरासह तालुक्यात अनेक ठिकाणी मान्सून पूर्व अवकाळी पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. मात्र, या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.

अंदाज होता, खरा ठरला

सोलापुरात पहाटेपासून ढगाळ वातावरण होतं. या वातावरणामुळे सोलापूरकरांना दिलासा मिळाला. आज शहरातील विविध भागामध्ये रिमझिम पावसाच्या सरी कोसळल्या, त्यामुळे अबाल वृद्ध सुखावून गेले होते. एकीकडे उकाड्याने हैराण झालेल्या सोलापूरकरांना अचानक आलेल्या पावसामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला. मागील दीड महिन्यापासून सोलापुरात तापमानाचा पारा 40 डिग्री सेल्सियसच्या पुढेच आहे. मात्र हवामान विभागाच्या अंदाजानुसारही आज सकाळपासून सोलापूर परिसरात ढगाळ वातावरणासह हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या सोलापूरकरांना दिलासा मिळाला.

अवकाळी पावसामुळे नागरिकांची तारांबळ…

दरम्यान, नाशिकच्या येवला शहरासह तालुक्याच्या उत्तर-पूर्व भागामध्ये काल अचानक हवामानात बदल होत संध्याकाळी जोरदार वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. भर उन्हाळ्यामध्ये झालेल्या या मान्सून पूर्व अवकाळी पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. वादळी वाऱ्यामुळे नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. मात्र, गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उकाड्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.

अचानक आल्याने तारांबळ

धाराशिवमध्येही काल पावसाने दमदार हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला. तब्बल अर्धा तास पाऊस पडत होता. त्यामुळे आधीच उकाड्याने होरपळून निघालेल्या धाराशिवकरांना मोठा दिलासा मिळाला. पण अचानक आलेल्या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली. कालच्या पावसामुळे जिल्ह्यात अनेक भागात विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला होता.

Published on: May 22, 2026 2:06 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us